सांडपाणी, अतिक्रमण व बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी

तातडीच्या कारवाईचे आदेश

अमरावती/21एप्रिल: अमरावती शहरात वाढलेल्या सांडपाणी समस्या आणि अतिक्रमणांचा फटका नागरिकांना बसत असल्याने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शनिवारी तातडीने पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी शहरातील अस्वच्छता आणि अतिक्रमणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकार्‍यांना कारवाईचे कडक आदेश दिले.
आयुक्तांनी सुरुवातीला समरा नगर उद्यानाकडे आपला मोर्चा वळवला. येथे सचिन थोते यांनी मांडलेली सांडपाण्याची समस्या ऐकून त्यांनी तात्काळ पाहणी केली. सांडपाणी तुंबल्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या धोक्याची दखल घेत त्यांनी यंत्रणेला चांगलेच खडसावले. त्यानंतर समरा नगर आणि गोराज नगर भागात पसरलेल्या अतिक्रमणांचा त्यांनी आढावा घेतला. येथील रस्त्यावर येणार्‍या सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाल्याचे पाहून त्यांनी तात्काळ अतिक्रमण हटाव कारवाईचे निर्देश दिले. कोंडेश्वर रोडवरील पेट्रोल पंपासमोरची नाली पाहून आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. मनपा उर्दू शाळा क्रमांक 11 समोरील अस्वच्छतेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तातडीने स्वच्छता करण्यास सांगितले. आठवडी बाजार परिसरातील मटण मार्केटमध्येही अतिक्रमणांमुळे नाल्यांचा प्रवाह अडकल्याचे आढळले, त्यावरही त्यांनी कडक भूमिका घेतली. यानंतर झोन 4 कार्यालय बडनेरा आणि गोपाल नगर येथील तक्रारींवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. महापालिका प्रशासनाच्या कामात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिला. आयुक्तांनी शहरात बेघर नागरिकांसाठी चालविल्या जाणार्‍या आधार निवार केंद्राला भेट देऊन तेथील अन्नाचा दर्जा व स्वच्छतेची बारकाईने तपासणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय यादव, भूषण पुस्तकर, मंगेश कडू, उद्यान अधीक्षक अजय विंचूरकर, अतिक्रमण प्रमुख श्याम चावरे, उपअभियंता श्रीरंग तायडे, हेमंत महाजन, विवेक देशमुख, राजेश आगरकर, रवींद्र तांबे, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाणे, उद्यान निरीक्षक मुकेश खारेकर, शहर समन्वयक श्वेता बोके आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button