डॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टिकोनावर मंथन

रायसोनी विद्यापीठात उपक्रम

अमरावती /21एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे विद्यार्थी संगोष्ठी – 2026 यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. ही संगोष्ठी स्कूल ऑफ होटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. संगोष्ठीचे मुख्य विषय होते – समकालीन भारतात राष्ट्रनिर्माण : वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि जागतिक मानवतावाद यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. कार्यक्रमात एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी 25 विद्यार्थ्यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संशोधन-आधारित पेपर सादर केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माजी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी अरुण वाघाट आणि अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी जागतिक मानवतावाद या संकल्पनेवर प्रकाश टाकला तसेच युवकांना अधिकारांसोबत कर्तव्ये पार पाडण्याचे महत्त्व सांगितले आणि डॉ. आंबेडकरांचे विचार राष्ट्रीय सीमांपलीकडे जाऊन मानवी गरिमा, समता आणि बंधुत्व यांचा सार्वत्रिक चौकट देतात, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकरांच्या बहुआयामी योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या प्रबंधाने रिझर्व बँक ऑफ इंडियाची पायाभूत रचना तयार झाली. हिराकुड धरणासारख्या प्रकल्पांमध्येही त्यांचा सहभाग होता. डॉ. आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, तर संपूर्ण राष्ट्राचे दूरदर्शी नेते होते, असे डॉ. देशपांडे म्हणाले. या दरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहील जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान केवळ संविधान रचण्यापुरते मर्यादित नाही. ते लोकशाही, समता आणि तर्कशुद्ध विचार यांचा समन्वय साधणारे विचारवंत होते. विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये आत्मसात करून सामाजिक परिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button