थेट आदिवासी पाड्यावर स्मार्ट सोलर योजनेचा संदेश
महावितरणचा पुढाकार; मेळघाटातील दुर्गम भागात ‘स्मार्ट’ सोलर योजनेचा व्यापक जागर

अमरावती /21 जानेवारी : राज्य शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ मेळघाटातील दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत पोहोचावा, यासाठी महावितरणने थेट आदिवासी पाड्यांवर जाऊन जनजागृती मोहीम राबविली आहे. कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या पुढाकारातून, रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरू असलेल्या बांधांवर जाऊनही आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधत योजनेची माहिती देण्यात आली.
राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे तसेच 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्या ग्राहकांसाठी ‘स्मार्ट’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 95 टक्क्यांपर्यंत अनुदान देऊन ग्राहकांच्या घरांच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह राज्य शासनाचे अतिरिक्त अनुदान मिळाल्यामुळे दुर्बल घटकांना वीज बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न या माध्यमातून साकार होत आहे.
अतिदुर्गम भागातील आदिवासी व दुर्बल घटकांना या योजनेचा थेट लाभ मिळावा, यासाठी मुख्य अभियंता अशोक साळुंके व अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अचलपूर विभागामार्फत विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी धारणी व चिखलदरा तालुक्यातील बैरागड, कुटुंगा, निमाढाणा, काटकुंभ, चुरणी, डोमा, राहू, हातरू, एकताई, हरिसाल, सेमाडोह, कुलंगना, शहापूर आदी गावांसह वाडी-वस्ती व पाड्यांवर जाऊन थेट जनजागृती केली. विशेष बाब म्हणजे, रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी आदिवासी बांधव काम करत होते, त्या ठिकाणीही महावितरणच्या पथकांनी भेट देत योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी बॅनर, भित्तीपत्रके व माहितीपत्रकांचे वाटप करून अर्ज प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत फुटाणे, निलेश बोरीकर, संजय दातीर, देवेंद्र चौधरी, राजेश तिवारी, विशाल पसारकर, स्वप्निल थेटे, तुषार रहाटे, चक्रधर पटेल, प्रतिक टेकाडे, सुबोध थोरात, टाले व पेटले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. दरम्यान, मोर्शी विभागातही कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट योजनेचे विशेष शिबिरे घेऊन गावोगावी जनजागृती करण्यात आली असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




