पोटे पाटील शैक्षणिक समूहात ‘टेकलॉन्स’चे थाटात उद्घाटन

तांत्रिक प्रयोगांच्या आविष्कारातून उमलली नवी पिढी

* अंतराळवीर अंगद प्रताप आणि जिल्हाधिकारी स्वप्नील वानखडे यांची उपस्थिती

अमरावती / 19 जानेवारी : पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक समूहाने आयोजित केलेल्या ’टेकलॉन्स 2026’ या भव्य तांत्रिक महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला असून, प्रशासकीय अधिकारी स्वप्नील वानखडे आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
तंत्रज्ञान, जिद्द आणि परिश्रमाची जोड देत विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रगत भारताचे स्वप्न या महोत्सवातून साकारले असून, विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांच्या कौशल्याची चुणूक पाहायला मिळत आहे. या महोत्सवाच्या मंचावर माजी राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, कुलगुरू डॉ. मिलिंद बार्‍हाते आणि गुगलमधील तज्ज्ञ वैभव आष्टीकर यांच्यासह दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दाद दिली. अमरावतीच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवणार्‍या या महोत्सवात पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वप्नील वानखडे यांनी तरुणांना अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटांना सामोरे जाण्याचा मंत्र दिला, तर अंतराळवीर अंगद प्रताप यांनी शिस्त, समर्पण आणि सातत्य या यशाच्या त्रिकोणाचे महत्त्व पटवून देत अवकाशातील भरारीचे स्वप्न दाखवले. डॉ. मिलिंद बार्‍हाते यांनी आजच्या युगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात संगणक प्रणाली, विदा विज्ञान, शेतीविषयक प्रदर्शने, आयुर्वेद आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या संदीप संस्थेने हॅकथॉनमध्ये बाजी मारून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर इतर पाच महाविद्यालयांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. राष्ट्रीय डिजिटल शिक्षण उपक्रमात चमकणार्‍या गुरुजन आणि विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयश पोटे पाटील आणि संचालक डॉ. पी. एम. खोडके यांच्या मार्गदर्शनात हा महोत्सव प्रगतीची नवी शिखरे सर करत आहे.

यशाचे मानकरी आणि पारितोषिके

या महोत्सवात नाशिकच्या संदीप तंत्रज्ञान संस्थेने एक लाखाचे मुख्य पारितोषिक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच इतर पाच महाविद्यालयांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांनी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या तांत्रिक सोहळ्याला खर्‍या अर्थाने एक वेगळी ओळख मिळवून दिली.

संबंधित बातम्या

Back to top button