मनपाच्या कचरा गाडीलाच आता ओढण्याची वेळ
कचरा वाहनांचे भररस्त्यात वाभाडे

* शहराच्या रस्त्यांवर विचित्र दृश्य
अमरावती/3 एप्रिल: स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करणार्या अमरावती महानगरपालिकेचा खरा चेहरा आज शहराच्या मुख्य रस्त्यावर उघडा पडला. कचरा वेचण्यासाठी आणि शहराचे आरोग्य सांभाळण्यासाठी धावणार्या घंटागाड्या स्वतःच आजारी पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रस्त्यावरून कचरा उचलण्याऐवजी या गाड्यांना आता दुसर्या वाहनांच्या मदतीने ओढत नेण्याची वेळ प्रशासनावर आली असून, यामुळे ’कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’च्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात कचरा संकलनाचे काम पाहणार्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाहनांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, भररस्त्यात ही वाहने बंद पडत आहेत. आज चक्क एका मोठ्या कचरा वाहनाला दुसर्या वाहनाने दोरीच्या साहाय्याने ओढत नेताना पाहून नागरिक अवाक झाले. महानगरपालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा यातून हे चित्र निर्माण झाले आहे. शहरात कचरा वेचण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, नादुरुस्त वाहनांमुळे कचरा संकलनात मोठी अडथळा येत आहे. ज्या वाहनांनी शहराची घाण साफ करायला हवी, तीच वाहने आता रस्त्यावर ओझ्यासारखी ओढली जात आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करताना कोणत्याही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जात नाही. महापालिकेचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असून, सामान्य करदात्यांच्या पैशांची अशा प्रकारे धूळधाण होत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कंत्राटदाराच्या या भोंगळ कारभारामुळे शहराच्या स्वच्छतेचा फज्जा उडाला असून, प्रशासनाने आतातरी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाचा रामभरोसे कारभार-शहरात कचरा गाडी ओढून नेण्याची वेळ येणे हे दुर्दैव आहे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची ही दुरवस्था पाहून अमरावतीकर विचारत आहेत की, नक्की कचरा कोणाचा उपसायचा? गाड्यांची दुरुस्ती वेळेवर होत नसेल तर स्वच्छतेचा दावा केवळ कागदावरच राहणार काय? प्रशासनाने यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.




