आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारा जेरबंद

गुन्हे शाखेची दस्तूर नगर भागात मोठी कारवाई

चाळीस हजारांच्या मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमरावती/ 9एप्रिल– शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर अमरावती शहर पोलिसांनी आता चांगलाच कडक बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने दस्तूर नगर येथील महानगरपालिका उद्यानासमोर छापा टाकून एका तरुणाला रंगेहात पकडले.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यावर भ्रमणध्वनीमधील एका अवैध उपयोजकाद्वारे (प) लोकांकडून पैसे लावून घेऊन हार-जितीचा जुगार खेळत असताना गिरीश उर्फ प्रिन्स संजय दाभानी याला अटक करण्यात आली.पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील अवैध सट्टेबाजी रोखण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष बैठक घेऊन कडक मोहिमेचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली. दस्तूर नगरमधील महानगरपालिका उद्यानासमोर एक तरुण भ्रमणध्वनीद्वारे लोकांना अवैध जोडणी (लिंक) देऊन ऑनलाइन सट्टा खेळवत असल्याची पक्की माहिती गुप्तबातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, आरोपी गिरीश दाभानी हा ’ओस्टिन 777’ नावाच्या अवैध उपयोजकावर लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावत असल्याचे दिसून आले. आरोपीने सरकारची फसवणूक करून कोणत्याही प्रकारचा कर न भरता हे अवैध व्यवहार सुरू केले होते.
या कारवाईत पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी गिरीश उर्फ प्रिन्स संजय दाभानी (रा. कलौती नगर, सराफ लेआउट, अमरावती) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा महागडा आय-फोन आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, सुनील लासूरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले आणि योगेश पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
तरुणाई सट्ट्याच्या विळख्यात-दस्तूर नगर भागात झालेली ही कारवाई शहरातील सट्टेबाजांचे धाबे दणाणणारी ठरली आहे. अवघ्या 20 वर्षांचा हा तरुण स्वतःच्या फायद्यासाठी ऑनलाइन सट्ट्याचा बाजार मांडून बसला होता. पोलिसांनी त्याच्याकडून महागडा भ्रमणध्वनी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून यामागे मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button