आज अमरावती महापालिकेच्या सत्तेचा फैसला

661 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सरासरी 54 टक्के मतदान

* कुणाचा गुलाल उधळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

* अपक्षांचा अनेकांना बसणार झटका

* दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

अमरावती / 16 जानेवारी : अमरावती महानगर पालिकेच्या सत्तासंग्रामासाठी गुरुवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. सुरवातीला अनेक ठिकाणी ईव्हिएम मशीन बंद पडल्यामुळे काही वेळासाठी खोळंबा झाल्याने मतदारांना ताटकळत बसावे लागले होते. आज शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीत एकूण 661 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे. शहरात अंदाजे एकूण 54 टक्के मतदान झाले असून, आज सकाळी 10 वाजल्यापासून नवसारी मार्गावरील क्रीडा संकुल भवन येथे मतमोजणीला प्रारंभ होईल. या निकालातून महापालिकेचा नवा कारभारी कोण ठरणार, याचे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
शहरातील 22 प्रभागांमधील 87 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. प्रशासनाने 805 मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था ठेवली होती. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीच्या दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद संथ होता. दुपारी 12 नंतर मतदानाचा वेग वाढला आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे, जिथे उपेक्षित आणि श्रमिक वस्त्यांमध्ये मतदारांनी पहाटेपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला, तिथे सुखवस्तू आणि सुशिक्षित समजल्या जाणार्‍या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र मतदारांनी कमालीची उदासीनता दाखवत घरात बसणे पसंत केले. शहरातील पश्चिम भागातील मुस्लिम बहुल क्षेत्र आणि मागास वस्त्यांनी लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला, तर वैचारिक चर्चा करणार्‍या प्रबुद्ध भागातील शुकशुकाटाने प्रशासकीय चिंतेत भर घातली आहे. यंदा महिला आणि पुरुष मतदारांनी उत्साहाने आपला हक्काचा वापर केला. उपलब्ध आकडेवारीनुसार, 1 लाख 44 हजार 860 पुरुष आणि 1 लाख 30 हजार 203 महिलांनी मतदान केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षांचे 473 आणि 120 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये काँग्रेसचे 74, भाजपचे 68, शिवसेना 67 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह विविध पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. विशेषतः माजी महापौर विलास इंगोले, चेतन गावंडे, तसेच प्रवीण हरमकर, विवेक कलोती, तुषार भारतीय, सुनील काळे आणि बबलू शेखावत यांसारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभागांतील निकालांकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रशासनाने मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सखी आणि पर्यावरणपूरक केंद्रे

प्रशासनाने प्रत्येक विभागामध्ये महिलांसाठी विशेष ‘सखी मतदान केंद्र’ (गुलाबी केंद्र) आणि निसर्गप्रेमींसाठी ‘आदर्श पर्यावरणपूरक केंद्र’ (हिरवे केंद्र) उभारले होते. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. संपूर्ण प्रक्रियेवर छुप्या कॅमेर्‍यांद्वारे (सीसीटीव्ही) आणि थेट प्रक्षेपण प्रणालीद्वारे बारीक नजर ठेवली जात होती.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी चाकाची  खुर्ची (व्हीलचेअर) उपलब्ध करून दिली होती. केंद्रावर मदतीसाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे शारीरिक अडथळे असलेल्या मतदारांना विनासायास आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता आले.

रिंगणातील उमेदवारांची पक्षनिहाय संख्या

महापालिकेच्या या रणसंग्रामात राजकीय पक्षांनी मोठी ताकद लावली आहे. यात भारतीय जनता पक्ष 68, काँग्रेस 74, शिवसेना (शिंदे गट) 67, शिवसेना (ठाकरे गट) 41, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 14 अशा प्रमुख दावेदारांसह वंचित बहुजन आघाडीचे 47 उमेदवार रिंगणात आहेत.

 

संबंधित बातम्या

Back to top button