आज मतपेटीतून उघडणार सत्तेचेद्वार आणि नेतृत्वाची ठरणार नवी दिशा
मनपा निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

* महानगरपालिका निकालातून ठरणार मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य
अमरावती /15 जानेवारी : अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. ही निवडणूक केवळ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी नसून, जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या वर्चस्वासाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
सत्तेच्या या महासंग्रामात भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या दिग्गजांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मतदान यंत्रात बंद झालेले हे निकाल येत्या काळात कोणाचे नेतृत्व मान्य करणार आणि कोणत्या नेत्याचा राजकीय प्रवास सुकर होणार, याचा फैसला करणार आहेत. त्यामुळेच सध्या संपूर्ण जिल्ह्याचे हृदय धडधडत असून निकालाची धाकधूक शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांच्या सभांनी शहर गाजवले. खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा आणि माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील या स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रचाराचे यश आता भाजपच्या जागांवर अवलंबून आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची धुरा आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांनी समर्थपणे पेलली आहे. या निकालावरच खोडके परिवाराची आगामी राजकीय वाटचाल निश्चित होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या निवडणुकीत मोठी झेप घेतली आहे. माजी मंत्री जगदीश गुप्ता, अभिजित अडसूळ आणि प्रीती बंड यांच्यासारख्या शिलेदारांनी मैदानात उतरून आपली ताकद दाखवून दिली आहे. सत्ताधारी महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेसनेही खासदार बळवंत वानखडे, डॉ. सुनील देशमुख आणि यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखली होती. बबलू शेखावत आणि विलास इंगोले यांच्या रूपाने अनुभवी चेहर्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवून महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले. विशेष म्हणजे, भाजप आणि राणा दाम्पत्य यांच्यातील जागांच्या वाटपावरून झालेला संघर्ष आणि त्यानंतर तुटलेली युती यामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राणा दाम्पत्याची स्थानिक पातळीवरील खरी ताकद आणि त्यांचे भाजपसोबतचे पुढील संबंध या निकालातून स्पष्ट होणार आहेत.
निवडणुकीचे मुख्य आकर्षण आणि राजकीय पेच-अमरावती महानगरपालिका निवडणुकीत 87 जागांसाठी 661 उमेदवार रिंगणात आहेत. प्रस्थापित नेत्यांच्या प्रभावाला धक्का लागणार की त्यांचे वर्चस्व कायम राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीमधील मित्रपक्षांतील अंतर्गत कलह आणि काँग्रेसची वाढलेली सक्रियता यामुळे निकालाचे गणित अत्यंत गुंतागुंतीचे आणि रंजक झाले आहे.




