बावनकुळे यांच्या खाणींचा मनपा निवडणुकीनंतर होणार पर्दाफाश
बच्चू कडू यांचा भाजपच्या भ्रष्ट कारभारावर अकोल्यात कडाडून हल्ला

अमरावती/14 जानेवारी : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बेनामी मालमत्तेचे आणि खाण व्यवसायाचे कच्चे चिट्ठे महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच चव्हाट्यावर आणले जातील, असा खळबळजनक इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित एका जाहीर सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. बावनकुळे यांच्या मालकीच्या नेमक्या किती खाणी आहेत आणि त्यामध्ये ’जगदंबा ट्रॅव्हल्स’चे किती ट्रक अनधिकृतपणे धावतात, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे कडू यांनी ठामपणे मांडले. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर या सर्व गैरप्रकारांचा पुराव्यासह खुलासा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपवर टीकेची झोड उठवताना बच्चू कडू म्हणाले की, हा पक्ष केवळ प्रभू श्रीरामाच्या नावाचा वापर करून मते लाटण्याचे काम करतो, प्रत्यक्षात ही केवळ पैसा ओरबाडणारी टोळी बनली आहे. नोटबंदीच्या काळातही सामान्यांना वेठीस धरून या पक्षाने मोठ्या प्रमाणात माया जमवली, असा थेट आरोप त्यांनी केला. पक्षासाठी चाळीस-चाळीस वर्षे रक्ताचे पाणी करणार्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून भाजपने आता केवळ धनदांडग्यांना आणि पैशाच्या जोरावर उड्या मारणार्यांना उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सर्वसामान्य जनता या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आज ना उद्या जनता प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण हाती घेऊन या भ्रष्ट नेत्यांचा माज उतरवेल, अशा अत्यंत जहाल शब्दात कडू यांनी आपला संताप व्यक्त केला. महापालिका निवडणुकीचे निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार असून, त्यानंतर भाजपचे सर्व काळे कारनामे जनतेसमोर मांडणार असल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
विशेष चौकशीची मागणी-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खाण व्यवसायाची आणि त्यातील मालवाहतूक करणार्या शेकडो वाहनांची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सत्तेचा गैरवापर करून उभारलेले हे आर्थिक साम्राज्य असून, 16 जानेवारीनंतर यातील सर्व बेनामी व्यवहारांचा आणि भाजपच्या आर्थिक लुटीचा पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी अकोल्यातील सभेत दिला.




