ह.व्या.प्र.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाद्वारे सामूहिक वाचन

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी : वाचन संकल्प महाराष्ट्र अंतर्गत उपक्रम

अमरावती /13 जानेवारी : महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडलद्वारा संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग द्वारे 12 जानेवारी रोजी ग्रंथालयामध्ये सामूहिक वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.मिलिंद अनासाने यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा दिला. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्य आणि कर्तव्य भावनेची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यानंतर सामूहिक वाचन उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत बोलतांना एन एन एस चे समन्वयक डॉ. नचिकेत राठोड यांनी वाचनाचे महत्व यावर प्रकाश टाकला ते म्हणाले वाचनातून केवळ ज्ञानवृद्धीच नव्हे तर सकारात्मक दृष्टिकोन, आत्मबळ आणि जीवनमूल्यांची जाणीव होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असल्या ग्रंथा पैकी त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या विषयावर तसेच स्वामी विवेकानंदांचे विविध ग्रंथाचे शांत, एकाग्र वातावरणात ग्रंथवाचन करत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा व आपल्या आवडीच्या विषयाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली राऊत उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्व विशद करत सांगितले की, डिजिटल युगातही पुस्तकांचे स्थान अबाधित असून वाचन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे विचार अंगीकारल्यास विद्यार्थी निश्चितच यशस्वी व जबाबदार नागरिक घडतील. या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख डॉ. रणजित केवले, डॉ. अक्षय वर्तक, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच ग्रंथालय समितीचे डॉ. योगेश रोचलानी, डॉ. विनोद गंगवानी, प्रा. स्वप्नील निमकार्डे , उपस्थित होते सर्वांनी मिळून सामूहिक वाचनात सहभाग नोंदवकार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विविध विभागांनी सहकार्य केले. सामूहिक वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम साधला गेला. वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

संबंधित बातम्या

Back to top button