शिंदे सेनेच्या विजयावर प्रभाग ‘दत्तक’ घेण्याची मंत्र्यांची ग्वाही

अमरावतीच्या विकासासाठी नगरविकास विभागातून भरघोस निधी देणार

* बडनेरा येथील जाहीर सभेत मंत्री संजय राठोड यांचे मतदारांना साकडे

अमरावती /12 जानेवारी : राज्यातील सत्तासंघर्षात प्रभावी ठरलेली शिवसेना (शिंदे गट) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपली पूर्ण ताकद पणाला लावत असल्याचे चित्र दिसत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 च्या विकासाची धुरा थेट राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. बडनेरा येथे आयोजित भव्य प्रचार सभेत बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा केली. जर मतदारांनी प्रभाग 22 मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार मनाली पहुरकर, ललित झंजाड आणि तेजस्विनी सरोदे यांना बहुमताने विजयी केले, तर हा प्रभाग स्वतः दत्तक घेऊन त्याचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगररचना विभागाचे कार्यभार असल्याने, या प्रभागासाठी तिजोरीची दारे उघडी केली जातील आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार सभेला व्यासपीठावर माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील, उपनेत्या प्रीती बंड, आशिष धर्माळे आणि श्याम देशमुख यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आज राज्याचे नेतृत्व करत आहे. ’लाडकी बहीण’ योजनेसारखे ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट उपसणार्‍या एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी अमरावतीकरांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेच्या राजकारणात शिंदे सेना आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज असून, विकासकामांच्या जोरावर हा प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून नावारूपास आणण्याचा मानस मंत्र्यांनी बोलून दाखवला. मतदानासाठी आता अल्प कालावधी शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचून ही विकासाची भूमिका मांडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
विकासाचा शब्द आणि उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी नाळ जोडून अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे सक्षमीकरण केले असून त्यांच्या प्रत्येक निर्णयात सामाजिक कार्याची जोड असते. अशा लोकभिमुख नेत्याच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवारांना निवडून दिल्यास, नगरविकास विभागाच्या माध्यमातून येथे निधीचा वर्षाव करून संपूर्ण परिसराचे नंदनवन केले जाईल, असा विश्वास संजय राठोड यांनी दिला.

संबंधित बातम्या

Back to top button