‘नन्हे सितारे’ मधून जिल्हा परिषद शाळांच्या प्रतिमेला नवी दिशा

अमरावती /11 जानेवारी : ‘नन्हे सितारे’ हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भविष्यातील मोठ्या उडीची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी केले.
‘नन्हे सितारे’ या जीवनकौशल्यांवर आधारित उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. शनिवार, 10 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद वर्धा, जे. सी. फ्लावर्स आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (जङऋ) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सतीश मुगल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना संजिता मोहपात्रा यांनी शिक्षक आणि अधिकार्‍यांना आवाहन केले की, जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी आपल्यालाच बदलायची आहे. अनेक शिक्षक आजही उत्तम काम करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले, त्यांना प्रशिक्षित केले आणि ‘नन्हे सितारे’च्या मंचावर आणले. आपण पहिलं पाऊल टाकलं आहे; आता जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा बदलणं अटळ आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे योग्य, पारदर्शक आणि न्याय्य मूल्यमापन व्हावे यासाठी शिक्षण, साहित्य आणि कायदा क्षेत्रातील अनुभवी व प्रतिष्ठित व्यक्तींनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या परीक्षकांमध्ये अ‍ॅड. नीता काचवे, अ‍ॅड. प्रतिभा टेटू, वैशाली गारकल, अतुल पडोळे, सौ. ज्ञानदा पाटील, प्रा. निकिता घाटे, प्रा. लोचना हरणे आणि सौ. योगिता वनारे यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील सादरीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता 1 ते 3, 4 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12 अशा चार गटांमध्ये स्पोकन इंग्लिश, कथा सादरीकरण आणि कविता वाचन या तीन प्रमुख प्रकारांत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जङऋच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख चित्रा खन्ना यांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या भक्कम पाठबळाशिवाय हा उपक्रम यशस्वी होणे शक्य नव्हते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकार्‍यांचे आभार मानत संपूर्ण ‘विनोबा’ टीमच्या कार्याचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

Back to top button