मनपा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून दिग्गज नेते मैदानात; अमरावतीत प्रचाराचा धुरळा!

सर्व राजकीय पक्षांचा धडाकेबाज प्रचार, मनपा निवडणूक झाली हायप्रोफाईल

* मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा, कार्यक्रम आणि बैठकांचा धडाका

अमरावती /8 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून राजकीय पक्षांचे उमेदवार, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच आता दिग्गज नेतेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आगामी 15 जानेवारीला मतदान होणार असून 13 जानेवारी रोजी सायंकाळी प्रत्यक्ष प्रचाराची तोफ थंडावणार आहे. प्रचारासाठी आता अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सभा, कार्यक्रम आणि बैठकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे.
मनपा निवडणूक लक्षात घेता, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत भव्य रोड-शो केला. त्याच दिवशी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अकॅडेमिक ग्राउंडवर भव्य जनसभा पार पडली. त्यानंतर काल एका बाजूला शिवसेना (शिंदे गट) मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावतीत प्रचार सभा झाली, तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध प्रभागांचा दौरा करत जनसभांना संबोधित केले.
तसेच काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील अमरावती दौर्‍यावर होते. त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराच्या रणनीतीचा आढावा घेत आवश्यक दिशा-निर्देश दिले. आज अमरावतीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जनसभा आयोजित करण्यात आली असून, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावतीत येणार असून गाडगे नगर परिसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. एकूणच आगामी महानगरपालिका निवडणुकीमुळे शहराचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराचे धडाकेबाज अभियान सुरू केले असून स्थानिक नेत्यांसोबतच राज्यस्तरावरील दिग्गज मैदानात उतरल्याने ही निवडणूक ’हायप्रोफाईल’ झाली आहे. सभा, जनसंवाद, कोपरा सभा, प्रभाग दौरे आणि कार्यकर्ता संमेलनांच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष विकासकामांचे दावे आणि विरोधकांच्या अपयशाचे मुद्दे जनतेसमोर मांडत आहे.

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने वाढली निवडणुकीची रंगत

गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध पक्षांच्या बड्या नेत्यांची ये-जा वाढल्याने निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे. नेत्यांच्या दौर्‍यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रचाराने वेग घेतला आहे. राजकीय पक्षांनी रणनीती आखून प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रश्नांवर भर दिला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारखे विषय प्रामुख्याने मांडले जात आहेत. यासोबतच गृहभेट आणि सोशल मीडिया प्रचारावरही विशेष जोर दिला जात आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही तीव्र झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर विकासकामातील अपयश आणि जनतेच्या दुर्लक्षाचे आरोप करत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदाची मनपा निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याने प्रचार अधिक आक्रमक झाला आहे. आता या प्रचाराचा आणि दिग्गज नेत्यांच्या सभांचा मतदारांवर किती परिणाम होतो आणि जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संबंधित बातम्या

Back to top button