केमिकल कारखान्याच्या आगीत महिला ठार

औद्योगिक वसाहतीत रासायनिक स्फोटाचे भीषण तांडव

* थिनर आणि टर्पेन्टाइन युनिटमध्ये दुर्घटना; मोठी वित्तहानी

अमरावती /6 जानेवारी : स्थानिक जुन्या बायपास मार्गावरील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या गोपी इंडस्ट्रीज या रासायनिक कारखान्यात 6 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत मोनाली सुनील कोडापे या 29 वर्षीय महिला कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे 8 ते 10 महिला कामगार कारखान्यात कार्यरत असताना हा स्फोट झाला असून यात अन्य 7 ते 8 महिला थोडक्यात बचावल्या तर एक महिला जखमी झाली आहे. उद्योजक सुमित खंडेलवाल यांच्या मालकीच्या या कारखान्यात थिनर आणि टर्पेन्टाइन यांसारख्या अतिशय ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून या घटनेत यंत्रसामग्रीसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील शाम नगर येथील रहिवासी सुमित खंडेलवाल यांच्या मालकीच्या या कारखान्यात दिवसाच्या पाळीत काम सुरू असताना अचानक रसायनांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की आसपासचे नागरिक भीतीपोटी रस्त्यावर आले. कारखान्यात थिनर आणि टर्पेन्टाइन सारख्या अतिशय ज्वालाग्राही रसायनांचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. यावेळी आत काम करणार्‍या 8 ते 10 महिला कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्या जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाल्या. मात्र दुर्दैवाने 29 वर्षीय मोनाली कोडापे या आगीच्या विळख्यात अडकल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी पुनीत कुलट यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत मोनाली यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृत मोनाली कोडापे या मूळच्या यवतमाळच्या असून त्यांचा विवाह 5 वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील सुनील कोडापे यांच्याशी झाला होता. पती सुनील हे शेजारील कारखान्यात कामाला असतानाच त्यांच्या पत्नीवर हा काळाने घाला घातला. राजापेठ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायवैद्यक चमुने दोन ते तीन तास घटनास्थळाची सखोल तपासणी केली. या भीषण अग्नितांडवामुळे कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कारखाना मालक सुमित खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेच्या त्रुटींमुळे एका निष्पाप महिला कामगाराचा बळी गेल्याने कामगार वर्गात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मोनालीच्या संसाराची राखरांगोळी-गोपी इंडस्ट्रीजमधील अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेली 29 वर्षीय मोनाली कोडापे ही मूळची यवतमाळची कन्या होती. 5 वर्षांपूर्वीच तिचा विवाह वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील सुनील कोडापे यांच्याशी झाला होता. पती शेजारील कारखान्यात कामाला असतानाच, नशिबाच्या क्रूर खेळाने मोनालीचा कामाच्या ठिकाणीच अंत झाला आणि तिचा हसताखेळता संसार क्षणात उद्ध्वस्त झाला.

संबंधित बातम्या

Back to top button