राहुल नार्वेकरांविरोधातील तक्रारीची आयोगाने घेतली दखल

पालिका आयुक्तांकडून मागवला अहवाल

मुंबई /1 जानेवारी :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (ता. 30 डिसेंबर) म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याच तक्रारीची आता राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून याबाबत आयोगाने महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे याबाबत आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या तीन प्रभागातून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करतेवेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी या तीन प्रभागातील अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा तसेच सभागृहात धमकावल्याचा आरोप इतर पक्षांच्या उमेदवारांनी केला होता. तसेच अधिकार्‍यांवर दबाव टाकून इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास मनाई केल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे.
यासंदर्भात काही पक्षाच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून नार्वेकर यांना त्यांच्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button