शरद पवार एनडीएमध्ये लवकरच सामील होणार
विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ

* पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरुन घणाघात
चंद्रपूर /31 डिसेंबर : अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार यांचे 8 खासदार एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याची महाराष्ट्रात चर्चा आहे. शरद पवार यांचे राजकारण आतापर्यंतचं पुरोगामी विचारांचं राहिलंय. मात्र पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याने या प्रकारामुळे त्यांच्या भूमिकेला गालबोट लागल्याचं आणि पवार साहेब विचारधारेला हरताळ फासून भाजपला मदत करतील का, अशी देखील चर्चा असल्याचा खळबळजनक संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील युती ही भविष्यातील राजकारणाची पहिली पायरी तर नाही ना? असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पुण्यात जर तडजोड होत असेल तर सगळ्याच ठिकाणी तडजोड होऊ शकेल, शरद पवारांचे अनेक आमदार-खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या खळबळजनक दावाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
भाजपने गुंडांची भरती सुरु करावी-दरम्यान, अजय सरकार याला भाजपकडून उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावर देखील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अजय सरकार सारख्या गुंडांचा जर भाजपला आश्रय घ्यावा लागत असेल तर आता भाजप गुंडांचा आणि गुन्हेगारांचा पक्ष झालाय. हे आता काही लपून राहिलेलं नाही. पोलिसांची भरती होते तशी भाजपने गुंडांची भरती राज्यभर आता सुरू केली पाहिजे. कोणत्या गुन्हेगारावर किती जास्त गुन्हे आहे असे निकष लावून भाजपने समिती स्थापन करून गुंडांची भरती केली पाहिजे. भाजपने लाज, लज्जा, शरम विकून खाल्ली आहे, अशा तीव्र शब्दात वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी हपापली असून भाजपला कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची एवढंच त्यांच्यासमोर उद्देश आहे असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.




