ध्येय, कर्तव्य आणि संघभावनेतून महावितरण कर्मचारी यांना मिळाली ऊर्जा

अमरावती /25 डिसेंबर : महावितरणचे नाते प्रत्येक कुटुंबाशी घट्ट जोडलेले आहे. वीजपुरवठा खंडित झाला की दिवस-रात्र न पाहता कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर होतात. कोणतीही तक्रार न करता सेवा देणार्या कर्मचार्यांना कामातून विरंगुळा मिळावा, या उद्देशाने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांनी केले. अमरावती शहर विभागात आयोजित महावितरणच्या मनोरंजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंते राजेश घाटोळे, प्रफुल्ल लांडे तसेच मोर्शी येथील कार्यक्रमात विजयकुमार कासट उपस्थित होते. विजेसारख्या क्षमाशून्य क्षेत्रात काम करताना ताण-तणाव कमी व्हावा आणि कर्मचार्यांची कार्यक्षमता अधिक वाढावी, यासाठी मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती परिमंडळात विभागनिहाय मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सुरक्षेची शपथ घेऊन सुरू झालेल्या या सोहळ्यात सुरूवातीला महावितरण अधिकारी, कर्मचारी यांच्या जबाबदार्या आणि उद्धीष्ठांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरासह विविध मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले. खेळातील चुरस, कराओकेच्या संगीताची साथ आणि कर्मचार्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण आनंदी झाले आणि कर्मचार्यांना नवी ऊर्जा मिळाली. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते म्हणाले की, महावितरणचे कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.




