अमरावती एसटी कर्मचार्यांना तिसर्या अपत्याची अट
अनुकंपा नोकरीसाठी नवीन नियमांची सक्ती

कुटुंब नियोजनाच्या नियमांचा मोठा फटका
अमरावती/30 एप्रिल- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने अनुकंपा नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कर्मचार्यांना 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल, अशा कर्मचार्यांच्या कुटुंबाला आता अनुकंपा नोकरीचा लाभ घेता येणार नाही. कुटुंब नियोजनाचे नियम या कर्मचार्यांवरही कठोरपणे लागू करण्यात आले आहेत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी 27 एप्रिल रोजी याविषयीचे परिपत्रक जारी केले आहे. 24 मार्चच्या शासकीय पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, 2005 च्या महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र नियमांचा आधार याला देण्यात आला आहे. या नियमांनुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीवर बंदी घालण्यात आली आहे. याआधी 28 मार्च 2001 च्या शासकीय निर्णयानुसार, 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरा मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यास हा नियम कडकपणे लागू मानला जातो. या निर्णयामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांवर थेट परिणाम होणार आहे. ज्या कुटुंबांमध्ये विहित तारखेनंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल, अशा कर्मचार्यांच्या वारसांना पात्रतेतून वगळण्यात येईल आणि विभागीय स्तरावर यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही. हा निर्णय सामाजिक धोरण आणि सरकारी नियमांमध्ये समतोल साधण्यासाठी घेतला आहे.
नवीन नियमांचा कर्मचार्यांवर मोठा परिणाम-तिसर्या अपत्याचा जन्म झालेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा नोकरी मिळणार नाही. विभागीय स्तरावर अशा प्रकरणांवर कोणतीही कार्यवाही होणार नाही. सामाजिक धोरण आणि सरकारी नियमांमध्ये समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे अनेक प्रभावित कुटुंबांमधील चिंता वाढली आहे.




