अंजनगाव सुर्जीत मतमोजणीनंतर समर्थकाची हत्या

अमरावती जिल्ह्याच्या निवडणुकीला लागले गालबोट...

* निवडणूक निकालाच्या दिवशी राजकीय तणावाचा स्फोट

* शहरात भीती व अस्वस्थतेचे वातावरण
* 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
* राजकीय निकालाच्या वादातून लाथाबुक्क्यांचा जीवघेणा हल्ला

अंजनगांव सुर्जी/22 डिसेंबर  – नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 (ब) मधील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरात निर्माण झालेल्या राजकीय तणावातून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मतमोजणीच्या दिवशी दुपारी घडलेल्या या हिंसक घटनेमुळे अंजनगांव सुर्जी शहरात भीती, राग आणि दुःखाचे वातावरण पसरले असून संपूर्ण शहर हादरले आहे. लोकशाही प्रक्रियेचा उत्सव असणारी निवडणूक, निकालानंतर हिंसाचारात बदलल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंजनगांव सुर्जी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 (ब) मधून शिवसेना (उबाठा) गटाकडून शहनाज बानो अब्दुल सलीम तर काँग्रेस पक्षाकडून नाजीया परवीन मोहम्मद इरफान या उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. मतमोजणीसाठी फिर्यादी मो. अखलाल मो. जाकीर (वय 29, रा. कुरेशी नगर) हे आपल्या वडील मोहम्मद जाकीर उर्फ कल्लू शेख नजीर कुरेशी (वय 55) तसेच इतर नातेवाईक आणि नागरिकांसह मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नाजीया परवीन मोहम्मद इरफान यांचा विजय घोषित झाला. निकाल जाहीर होताच विजयी गटाच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा उत्साह काही वेळातच आक्रस्ताळेपणात बदलला. पराभूत गटाच्या लोकांची चेष्टामस्करी करण्यात येऊ लागली. परिस्थिती बिघडू नये, कोणताही वाद होऊ नये या उद्देशाने फिर्यादी, त्यांचे वडील आणि इतर नागरिक शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान आठवडी बाजार परिसरातील वेल्डिंग दुकानासमोर आरोपींनी त्यांना अडवून अपमानास्पद व चिथावणीखोर शब्द वापरले आणि मोठ्याने हसत टिंगलटवाळी सुरू केली.फिर्यादीने संयम राखत आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निवडून आला आहात, तुमचा आनंद व्यक्त करा, मात्र आम्हाला शिवीगाळ करू नका, असे सांगून वाद टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आरोपी अधिकच आक्रमक झाले. काही क्षणांतच आरोपी फिर्यादीसमोर आले आणि एकत्र येत त्यांच्या वडिलांवर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली. मोहम्मद जाकीर यांना जमिनीवर पाडण्यात आले आणि खाली पडल्यावरही त्यांच्या छातीवर वारंवार लाथा मारण्यात आल्या. या अमानुष मारहाणीत मोहम्मद जाकीर हे जागीच बेशुद्ध पडले. परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या रागातून एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी फिर्यादी मो. अखलाल मो. जाकीर यांच्या तक्रारीवरून अंजनगांव सुर्जी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण 12 आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले असून हत्या, बेकायदेशीर जमाव, दंगल, शिवीगाळ आणि मारहाणीशी संबंधित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मतमोजणीच्या दिवशी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास आठवडी बाजार परिसरात घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर अंजनगांव सुर्जी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 10 हा परंपरेने कुरेशी समाजाचा प्रभाग मानला जातो. या प्रभागात निवडणुकीच्या काळात समाजातील विविध गटांमध्ये तीव्र राजकीय चढाओढ दिसून येते. यंदाच्या निवडणुकीतही निकाल जाहीर होण्याआधीच समाजात तणावाची भावना होती. निकालानंतर विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख यामुळे भावना अनावर झाल्या आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुरज बोंडे आणि दुय्यम पोलिस निरीक्षक विनोद धाडसे पुढील तपास करीत आहेत. मुख्य आरोपींसह इतर संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळाची सखोल पाहणी करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.या घटनेवर शहरातील नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लोकशाही प्रक्रियेचा भाग असलेल्या निवडणुकांनंतर संयम आणि सहिष्णुता राखणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले. राजकीय मतभेद हिंसाचारात बदलणे ही समाजासाठी अत्यंत घातक बाब असून अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो, अशी भावना व्यक्त होत आहे. अंजनगांव सुर्जीतील ही घटना राजकीय स्पर्धा किती टोकाला जाऊ शकते, याचे गंभीर आणि विदारक उदाहरण ठरली आहे. निवडणूक संपली असली तरी तिच्या निकालानंतर घडलेल्या हिंसाचारामुळे शहराचे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरात पुन्हा शांतता प्रस्थापित करणे, हेच आता पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अंजनगांव सुर्जीतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. मोहम्मद जाकीर यांची हत्या निवडणूक संबंधी वादातून घडली आहे. सध्या मुख्य आरोपी आणि अन्य 12 जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि आवश्यक सर्व प्रकारचा बंदोबस्त राबविला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, पोलिसांसोबत सहकार्य करावे. प्रकरणाची सविस्तर तपासणी सुरू आहे आणि दोषींना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
-मनीष ठाकरे,
एसडीपीओ अंजनगांव सुर्जी

संबंधित बातम्या

Back to top button