आजपासून दहावीची परीक्षा, बोर्ड अलर्टवर
554 केंद्रांवर सीसीटीव्हीच नाहीत

संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
मुंबई/19 फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या.
प्रत्यक्षात मात्र अद्यापही 554 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. 191 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. त्यातील 42 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे या केंद्रांवरील शिक्षक, कर्मचारी यांची अदलाबदल केली जाणार आहे. मागील वर्षातील परीक्षेत 31 परीक्षा केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार आढळून आले होते.
त्यामुळे या परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यादृष्टीने राज्य मंडळामार्फत भरारी पथके, बैठी पथके नियुक्ती केली आहेत. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवावी लागणार आहेत.याशिवाय संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 9 हजार 788 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी-इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 9 हजार 788 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात पुणे – 1338, नागपूर – 1295, छत्रपती संभाजीनगर – 923 , मुंबई – 2602, कोल्हापूर – 884, अमरावती – 1058, नाशिक – 805, लातूर – 556, कोकण – 327 यांप्रमाणे विभागनिहाय दिव्यांग विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. पुणे विभागातील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लॅपटॉप व अन्य सॉफ्टवेअरचा वापर करण्याची मुभा देण्यात येणार आहे.




