3 वर्षात कुपोषणामुळे 14 हजार 526 बालमृत्यू

महायुती सरकारच्या कार्यकाळात गेल्या

* आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत धक्कादायक कबुली

नागपूर /12 डिसेंबर : महायुती सरकारच्या कार्यकाळात म्हणजे 2022-23 ते 2024-25 या 3 वर्षात राज्यात कुपोषणामुळे14 हजार 526 बालमृत्यू झाले, अशी कबुली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. हे बालमृत्यू मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे असल्याची धक्कादायक माहिती आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात देण्यात आली आहे.
कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यूं रोखण्यासाठी राज्य सरकार करोडो रुपये खर्च करुन विविध योजना राबवीत आहे. पण कुपोषणाचे प्रमाण वाढले असून 49 हजार बालमृत्यू झाले आहेत का, असा प्रश्न स्नेहा दुबे, मनोज जामसुतकर, चेतन तुपे आदींनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर आबिटकर यांनी 14 हजार 526 बालमृत्यू झाल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 नुसार नवजात शिशू मृत्यू दर प्रति एक हजारामागे 12 पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या जनगणना आयुक्तांनी 2025 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार राज्याचा 2023 चा नवजात मृत्यू दर प्रति हजार बालकांमागे 11 आहे. राज्य शासनाने शाश्वत विकासाचे ध्येय साध्य केले असल्याचा दावा आबिटकर यांनी केला आहे. पूरक पोषण आहार, नियमित आरोग्य तपासणी, डॉ. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, सॅम बालकांसाठी विशेष उपक्रम, पोषण अभियन आदी योजना राबविल्या जात आहेत. नर्चर अ‍ॅपद्वारे कुपोषित बालकांचा पाठपुरावा करण्यात येतो, असे नमूद करुन आबिटकर यांनी नवजात शिशूंच्या काळजीसाठी असलेल्या योजनांचीही माहिती दिली.

संबंधित बातम्या

Back to top button