सिपना नदीच्या पात्रात सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

टाकरखेड्याच्या नदीत खेळता खेळता काळाचा घाला

धारणी/13 मे- टाकरखेडा गावातील सिपना नदीने बुधवारी एका निष्पाप चिमुकल्याचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हळहळला. पहिलीत शिक्षण घेणारा सहा वर्षीय कमलेश नवलसिंग भिलावेकर हा मोठ्या भावासोबत नदीकाठी खेळत असताना पाण्यात बुडाला. ग्रामस्थांनी तातडीने नदीतून बाहेर काढून धारणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कमलेश नवलसिंग भिलावेकर हा आपल्या दहा वर्षीय मोठ्या भावासोबत सिपना नदीकाठी खेळत होता. खेळताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात गेला. घाबरलेल्या मोठ्या भावाने शेताकडे धाव घेत आरडाओरड केली. आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी नदीकाठी धावले. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत कमलेशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने धारणी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.
कमलेश हा जिल्हा परिषद शाळेत पहिलीत शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनाने भिलावेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. उन्हाळ्यात नदी नाल्यांजवळ खेळणार्‍या मुलांकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button