…त्या आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंची न्यायालयात पेशी

500 रुपयांचा दंड, जामीन मंजूर

अमरावती /11 डिसेंबर : गोसेखुर्द जलप्रकल्प ग्रस्तांच्या मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये झालेल्या आंदोलनाच्या प्रकर णाला पुन्हा एकदा वेग आला आहे. सात वर्षांपूर्वी घडलेल्या या आंदोलनप्रकरणाची सत्र न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरोधात वॉरंट जारी करून प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज कडू न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावत जामिनावर मुक्तता देण्यात आली.
घडलेली घटना ही त्या काळात अत्यंत गाजलेली ठरली होती. गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनाने आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातून नागपुरातील आमदार निवास येथे दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांनी थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीवर जाऊन आंदोलन छेडल्याने प्रशासनही काही काळ हादरून गेले होते. विशेष म्हणजे, 20 ऑक्टोबर 2018 रोजी आमदार बच्चू कडू यांनी आमदार निवासात प्रवेश करून इमारतीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केल्याची नोंद त्या वेळी करण्यात आली होती. या अनपेक्षित प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली होती. त्याचवेळी प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप कडू यांनी त्या वेळी केला होता.आंदोलनातील या घटनांवरून दाखल झालेल्या प्रकरणाची सुनावणी अलीकडे सुरू झाली. न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेची गंभीर दखल घेत बच्चू कडू यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. आज न्यायालयीन आदेशाप्रमाणे ते व्यक्तिगतरीत्या हजर राहिल्यानंतर, न्यायालयाने त्यांच्यावर 500 रुपयांचा दंड ठोठावला आणि जामिनावर मुक्तता दिली. या निर्णयानंतर पुन्हा एकदा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शासनाकडून दिलेल्या आश्वासनांचा ठोस परिणाम अद्यापही प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी कायम आहे. त्यामुळे पुढील काळात या आंदोलनप्रकरणाचा राजकीय आणि सामाजिक पातळीवर कोणता प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button