भगवदगीतेमधील बारावा अध्याय भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व सांगणारा

अक्षय धानोरकर यांचे प्रतिपादन

अमरावती /10 डिसेंबर : भगवदगीता ही सम्पूर्ण मानव जातीला भगवंतांनी दिलेली अनमोल देणगी असून त्यातील बारावा अध्याय हा भक्तियोग सांगणारा आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की निर्गुण निराकाराची भक्ती करणे थोडे कठीण असून सगुण साकाराची भक्ती अधिक सोयीची ठरते. तसेच भगवंतांनी खर्‍या भक्ताचे अनेक गुण येथे स्पष्ट केले आहेत असे प्रतिपादन योगतज्ञ व मुख्य वक्ता अक्षयजी धानोरकर यांनी केले. विवेकानंद केंद्र अमरावती शाखेच्या वतीने आयोजित गीताजयंती उत्सवात ते उपस्थितांना संबोधित करत होते. अक्षयजी धानोरकर पुढे म्हणाले की सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन तसेच इर्ष्या, द्वेष आदि भावनांचा त्याग करून आणि कर्मफलांची आसक्ती सोडून जो भक्त माझ्यामध्ये लीन होतो तो खरा भक्त असे भगवंत म्हणतात. या उत्सवाला केंद्राचे व्यवस्था प्रमुख संजयजी पितळे, अंजलीताई पितळे, शिवानीताई चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. वंदनाताई पराते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की नवीन पिढीला अशा कार्यक्रमात आवर्जून आणणे हे प्रत्येक ज्येष्ठाचे कर्तव्य आहे. कारण हा अध्यात्मिक ठेवा बालकांवर सुसंस्कार करीत असतो व नवीन पिढी यातूनच देशप्रेमाने भारली जाते. अमृत परिवार प्रमुख चारुदत्त चौधरी यांनी आपल्या उदबोधनात दैदीप्यमान प्राचीन संस्कृतीचा वैज्ञानिक अंगाने अभ्यास करण्यावर भर दिला आणि पुढे सांगितले की सत्यमेव जयते, जीवेत शरद: शतम सारखे आजचे अनेक विचार हे वेद उपनिषादातून आलेले आहेत. याप्रसंगी विजय भुयार, संजय कुलकर्णी, डॉ. आर. सी. कपिल, रमेश सोरते, विनायक वाटणे व चि.आरंभ बनकर या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन, वैयक्तिक गीत व आभार रेवतीताई तावरे यांनी केले. वक्ता परिचय प्रशांत वानखडे, विवेकवाणी तुकाराम कोकणारे यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रमोद दादा महल्ले, केंद्र कार्यकर्ता अनिकेत मिसळकर, आदित्य कळसाईत, दीपिका यादव, धनश्री खडसे, गोपाल पारखी, प्रेम खांडेकर व चि. आयुष महल्ले यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

संबंधित बातम्या

Back to top button