राकाँचे गुड्डू धर्माळे 7513 मतांनी विजयी

शेगाव-रहाटगाव प्रभाग 1 मध्ये चुरशीची लढत

* भाजपच्या 2 महिला उमेदवारांनी राखला गड कायम
* भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध
* प्रभागावर महायुतीची पकड मजबूत

राकाँ (अजित गट)-2, भाजप-2

अमरावती /16 जानेवारी : महानगर पालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालात शेगाव – रहाटगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. एकूण 44 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागलेल्या या प्रभागात मतदारांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या शिलेदारांवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. प्रभाग 1 मधील चारही गटांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या असून, काही ठिकाणी निसटता तर काही ठिकाणी एकतर्फी विजय मिळवत उमेदवारांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली आहे. या निकालाने प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे स्पष्ट केली आहेत.
शेगाव – रहाटगाव प्रभागाच्या ’अ’ गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कल्याणी आकाश तायडे यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यांनी 4968 मते मिळवून आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मेघा रत्नदीप बागडे यांचा पराभव केला. बागडे यांना 4242 मतांवर समाधान मानावे लागले. ’ब’ गटात मात्र अत्यंत अटीतटीची लढत झाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चंद्रशेखर एकनाथ खेडकर यांनी 5710 मते घेत विजय संपादन केला. त्यांनी भाजपच्या धीरज प्रभाकर बारबुद्धे यांचा अवघ्या 157 मतांच्या फरकाने पराभव केला. बारबुद्धे यांनी 5553 मते मिळवून खेडकर यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले. प्रभागाच्या ’क’ गटात पुन्हा एकदा भाजपने आपले वर्चस्व राखले. वंदना प्रदीप मडघे यांनी 4967 मते मिळवून विजय मिळवला, तर काँग्रेसच्या अर्चना रवींद्र इंगोले यांनी 4670 मते घेत त्यांना तगडे आव्हान दिले. सर्वात लक्षवेधी निकाल ’ड’ गटात लागला, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रशांत उर्फ गुड्डू रामकृष्ण धर्माळे यांनी 7513 मते घेत विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे बाबाराव गायकवाड यांचा प्रचंड मताधिक्क्याने पराभव केला. गायकवाड यांना केवळ 2502 मते मिळाली, ज्यामुळे हा विजय एकतर्फी ठरला.

संबंधित बातम्या

Back to top button