‘विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण’ कार्यान्वित
शहरात नागरिकांच्या पोलीस तक्रारींसाठी

* सर्व प्रकारच्या चौकशीचे अधिकार
अमरावती /5 डिसेंबर : शहरात नागरिकांना पोलीस अधिकार्यांच्या अधिकारांचा गैरवापर किंवा अन्यायकारक वर्तनापासून संरक्षण देण्यासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला असून प्राधिकरणाचे उद्दिष्ट नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे आणि आवश्यक ती कारवाई करणे आहे.
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उषा ठाकरे कार्यरत आहेत, तर निवृत्त पोलीस अधीक्षक पी.टी. पाटील सदस्य आणि नागरी प्रतिनिधी पंकज निखार यांनी आपली जबाबदारी सांभाळली आहे. प्राधिकरणाचे कार्यालय फेब्रुवारी 2025 पासून विशेष आय.जी.पी. बंगला ते शासकीय विश्राम गृह रोड, गुलमोहर अपार्टमेंटच्या बाजूला, कॅम्प, अमरावती-444602 येथे कार्यरत आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0721/ 2990306 आणि ई-मेल वलिर. राीांरहर िेश्रळलश.र्सेीं.ळप उपलब्ध आहे. प्राधिकरणाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकारी/ कर्मचार्यांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पोलीस उप-अधीक्षक किंवा त्याहून उच्च अधिकार्यांविरुद्ध तक्रारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे, मुंबई येथे दाखल केल्या जातात. प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात पोलीस कोठडीतील मृत्यू, गंभीर दुखापत, बलात्कार किंवा त्याचा प्रयत्न, अयोग्य अटक, भ्रष्टाचार, खंडणी, जमीन किंवा घर बळकावणे यासारख्या गंभीर तक्रारींचा समावेश आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. नागरिक साध्या कागदावर किंवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदविण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. नोंद झाल्यानंतर प्राधिकरण चौकशी करून संबंधित पोलीस अधिकार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करते. महाराष्ट्रात एकूण सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे कार्यरत आहेत – अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि कोकण विभाग (नवी मुंबई). या प्राधिकरणांच्या माध्यमातून नागरिकांना पोलीस अधिकार्यांच्या गैरवर्तनाविरुद्ध त्वरित न्याय मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.




