विधवा साळीवर प्रेमसंबंधांसाठी जावयाकडून दबाव

जीवे मारण्याची धमकी, महिलेचा आरोप

अमरावती / 19 जून: विधवा साळीच्या असाहायतेचा गैरफायदा घेउन जावयाने तिच्यावर प्रेमसंबंधांसाठी दबाव निर्माण केला. तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिलेच्या पतीचे सुमारे दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर या महिलेचे नात्याने लहान जावई असलेल्या व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध स्थापित झाले. मात्र काही दिवसांपूर्वी तिने जावयासोबतचे संबंध तोडले होते. आपल्याशी कुठल्याही प्रकारचा सपर्क करु नये, अशी तंबी तिने तिने त्याला दिली होती. मात्र आरोपीने महिलेचा पिच्छा सोडला नाही. दरम्यान महिला दुचाकीने आपल्या लहान मुलासोबत नोकरीच्या निमित्ताने जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि रस्त्यात गाठले. त्याने महिलेला थांबवून प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे महिलेने आपल्या भावाला फोन करुन तेथे बोलाविले. तेव्हा आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्याशी हुज्जतबाजी करायला सुरुवात केली. प्रेमसंबंध ठेवले नाही तर जिवे मारण्याची धमकी त्याने महिलेला दिली. शिवीगाळही केली.
यावेळी महिलेने मदतीसाठी आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेला. या प्रकरानंतर पिडितेने तात्काळ राजापेठ पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button