नगरपालिका- नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच
नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

नवी दिल्ली/5 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करताना 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र राज्यातील 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींना निवडणुकांना आयोगाकडून न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती देण्यात आली होती.
त्यामुळे त्या निवडणुकांसाठी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मात्र, याविरोधात नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश देण्यात आले होते. या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, असे आजच्या (5 डिसेंबर) सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नागपूर खंडपीठाने दोन दिवसांपूर्वीच सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला लावण्यासंदर्भात निकाल दिला आहे. या आदेशाला आव्हान देण्यासाठी राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील ‘एआयएम आयएम’चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक कार्यक्रमाला बाधा नको, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने 21 डिसेंबरला मतमोजणी कायम ठेवली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांमधील या संदर्भातील सर्व याचिका निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याच्या आदेशाचा पुनरुच्चार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता कुणीही याचिका दाखल केली तर 21 डिसेंबरलाच मतमोजणी होणार, हेही स्पष्ट झाले आहे. राज्यातील 246 नगरपंचायती आणि 42 नगरपंचायतींचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता.




