गजल समारोपात कवी वैभव जोशींनी केला अमरावतीकरांसोबत ‘सोबतीचा करार’

अखिल भारतीय गजल संमेलनाचा दिमाखात समारोप

अमरावती / 9 फेब्रुवारी : मराठी गजल ही केवळ कविता नसून ती लोकमनाचा आरसा आहे. सुरेश भट यांनी आपल्या अथांग परिश्रमातून गझल सर्वसामान्यांच्या ओठांपर्यंत पोहोचवली; मात्र ज्या प्रमाणात मराठी कवितेचे मूल्यमापन आणि समीक्षा झाली, त्या तुलनेत गझलेवर अभ्यासकांनी फारसे लक्ष दिले नाही. हा मराठी गझलेवर झालेला मोठा अन्याय असल्याची स्पष्ट आणि परखड खंत रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केली.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित तिसर्‍या ’अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलना’च्या समारोप प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस चाललेल्या या संमेलनाने मराठी गझलेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दाखवून दिले. संमेलनाचे उद्घाटन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्या हस्ते झाले होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून नाना लोडम उपस्थित होते. यावेळी नाना लोडम यांनी गझलेच्या संवर्धनासाठी ’मराठी गझल परिषद’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. ज्येष्ठ गझलकार वैभव जोशी यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करताना, गझल लिहिताना घाई करू नका आणि सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होण्यापेक्षा लेखनाचा दर्जा सुधारा, असा मोलाचा सल्ला दिला. या सोहळ्यात गझलकार गजानन वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते ’स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर संदीप व्यंकट देशमुख, मंगेश देशमुख, क्षिप्रा देशमुख आणि वल्लरी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी दिवंगत गझलकारांच्या आठवणीत सात बहारदार मुशायरे पार पडले. दुपारी शिवाजी जवरे यांच्या अध्यक्षतेखाली ’मराठी गझलचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. संमेलनाची सांगता ’सोबतीचा करार’ या वैभव जोशी यांच्या सुश्राव्य गझल मैफिलीने झाली. आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेल्या या गझलांना गायक दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या सुरांनी सजवले आणि रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन नाना लोडम यांनी मानले.

गझलेचा जागर आणि पुरस्काराचा सन्मान

या दोन दिवसीय संमेलनात केवळ गझल गायन झाले नाही, तर गझलेच्या पुढील वाटचालीवर सखोल चिंतनही झाले. गजानन वाघमारे यांना प्रदान करण्यात आलेला मानाचा पुरस्कार हा त्यांच्या गझल सेवेचा गौरव ठरला. वैभव जोशी यांची मैफिल आणि विदर्भातील रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, मराठी गझल आता नव्या उत्साहाने समाजमनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे, हेच या संमेलनाचे फलित ठरले.

संबंधित बातम्या

Back to top button