नागपूर जवळच्या डइङ कंपनीत स्फोट 17 ठार

18 जखमी, दारुगोळा तयार करताना घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मृतांच्या वारसांना पाच लाख

नागपूर/1 मार्च – राऊळगाव येथील एका एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत, तर 2 पथके मदतीसाठी दाखल झाली आहेत. याशिवाय, ’पेसो’ आणि ’डिश’ या तांत्रिक तपासणी करणार्‍या विभागांच्या पथकांनी स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राऊळगाव येथील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांनी प्रशासनाला सांगितले की, या दुर्घटनेमागील कारणे आणि कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याची सखोल चौकशी करावी.या दुर्घटनेमुळे परिसरात शोक आणि दहशत पसरली असून, प्रशासन घटनास्थळी सुरक्षा आणि बचाव कार्यात पूर्णपणे सक्रिय आहे. जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका-बावनकुळे -काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एस. बी. एल. इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीमध्ये झालेला स्फोट दुर्दैवी आहे. रोजीरोटीसाठी काम करणार्‍या महिला व पुरुष कामगार यात बळी पडले. दुपारी 4 पर्यंत एकूण 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या युनिटमध्ये महिला कामगार अधिक असल्याने यात त्यांची संख्या अधिक आहे. गेलेला जीव परत येणार नाही. मात्र ज्यांचे जीव गेले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. संबंधित कंपनीने नियमाप्रमाणे आवश्यक असणार्‍या सर्व रितसर परवानग्या घेतल्या का, योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का याचा कसून तपास केला जात असून कोणालाही यात मोकळे सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या स्फोटाची माहिती समजताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी जिल्हा प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे व जखमींवर तातडीने औषधोपचार सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, एनडीआरएफ यांची टिम, वैद्यकीय पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने ऑरेंजसिटी हॉस्पिटल व इतरत्र उपचारासाठी हलविले. दुपारी त्यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेवून सर्व घटनेची यांच्याकडून माहिती घेतली. वित्त व नियोजन राज्यमंत्री ड आशिष जैस्वाल त्यांच्यासोबत होते. याचबरोबर खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार राजू पारवे, मनोहरराव कुंभारे, डॉ. राजीव पोतदार, माजी जि. प. अध्यक्ष सुनीताताई गावंडे, समीर उमप, संदीप सरोदे आदी उपस्थित होते.
या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात का याच्या नियमित तपासण्या संबंधित विभागांनी करायलाच हव्यात. यात ज्यांनी नियमांचे पालन केले नाही अशाविरुध्दही कारवाईचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूर येथील स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनएरएफ) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.

संबंधित बातम्या

Back to top button