देशाला मागे नेण्यासाठी काही प्रवृत्तींकडून फूट टाकण्याचा प्रयत्न-मोहन भागवत

नागपूर/4 जून : जगाला दिशा दाखविण्याची भारताची वेळ आली आहे व योग्य पद्धतीने सुसज्ज होऊन मार्गक्रमण करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र देशाला मागे नेण्यासाठी काही प्रवृत्तींकडून देशात फूट टाकण्यात येत आहे. त्यांच्याकडून जाणुनबुजून अडचणी निर्माण करत लहान निमित्त शोधून समाजजीवनात अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.
संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा गुरुवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. रेशीमबाग मैदानावर झालेल्या कार्यक्रमात उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया व वर्गाचे सर्वाधिकारी महेंद्र सिंह मग्गो प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात संस्कारांना महत्त्व आहे. मात्र देशविरोधी विचार करणार्या लोकांना संस्कार वाढले तर त्यांचे नुकसान होईल असे वाटते. त्यामुळे आपल्या संस्कारांना प्रभावित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संघर्षांमध्ये अडकलेल्या जगाला भारताच्या विचारांवरचालणार्या नवीन मार्गाची आवश्यक आहे. भारताची वेळ जरी आली असली तरी त्यासाठी योग्य तयारी करत सुसज्ज होणेदेखील गरजेचे आहे. नवीन मार्ग द्यायचा आहे तर इतर जगाची कॉपी करून चालणार नाही. आपल्या विचारांच्या आधारावर नवीन दिशा दाखवावी लागेल, असेदेखील ते म्हणाले.




