विदर्भात 15 जूननंतरच मान्सून
केरळात मान्सूनचे आगमन

नागपूर /4 जून: मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले आहे. यंदा तो नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल बनत असून येत्या काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भातील नागरिक आणि शेतकर्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भात 15 जूननंतरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विदर्भात साधारणपणे 10 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे आगमन होत असते. यापूर्वीच्या वर्षांमध्येही याच कालावधीत मान्सून दाखल झाल्याचे दिसून आले आहे. काही वेळा तो लवकर तर काही वेळा उशिरानेही पोहोचतो. सध्या मात्र विदर्भासाठी मान्सूनच्या आगमनास आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती तयार झालेली नसल्याने त्याच्या आगमनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, असं शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे. हवामान विभागाने वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.




