आंतरधर्मीय विवाहाला नातेवाईकांचा विरोध

उपनिबंधक कार्यालयात आलेले वर-वधू पोलीस ठाण्यात

मी सज्ञान, मला लग्नाला रोखणारे तुम्ही कोण? तरुणीचा सवाल

नातेवाईकांची परस्परांशी मारामारी, पोलीसांची मध्यस्थी

अमरावती /4जून- अमरावतीच्या उपनिबंधक कार्यालयात आंतरधर्मीय विवाह नोंदणीच्या वेळी चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. लग्नासाठी पोहोचलेल्या तरुण-तरुणीच्या निर्णयाला दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवला. या वादानंतर दोन्ही गटांत धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले.तरुण आणि तरुणीने आंतरधर्मीय विवाहास पसंती दर्शवली होती. नियमानुसार त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयात सादर केली होती. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून विवाह नोंदणीचे आवेदन सार्वजनिक दर्शनी भागात लावले होते. याची कुणकुण लागताच तरुण आणि तरुणीच्या नातेवाईकांनी कार्यालयात धाव घेतली. लग्नासाठी होणारा हा विरोध इतका प्रबळ होता की, दोन्ही बाजूंमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपस्थितांनी गाडगे नगर पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, विवाह नोंदणीसाठी अडून बसलेल्या तरुणीने आपण सज्ञान असल्याचा दावा करत, त्याच तरुणाशी विवाह करण्याचा आपला ठाम निश्चय असल्याचे स्पष्ट केले. आपण कोणाशीही बळजबरीने लग्न करत नसून, केवळ त्या तरुणाशीच विवाह करणार असल्याचे तिने नातेवाईकांना ठणकावून सांगितले. एका बाजूला मुलीची ही जिद्द आणि दुसरीकडे नातेवाईकांचा प्रचंड विरोध, यामुळे कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अनुचित प्रकार टाळण्यासाठी गाडगे नगर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलीस दोन्ही गटांतील लोकांना शांत करण्यासाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले, जिथे सायंकाळपर्यंत समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
लग्नाबाबत सज्ञान तरुणीचा ठाम निश्चय -तरुणीची कायदेशीर अधिकाराची मोठी लढाई विवाह हा दोन व्यक्तींच्या सहमतीचा वैयक्तिक निर्णय आहे. कायद्याने सज्ञान असलेल्या व्यक्तीला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकरणांमध्ये कौटुंबिक विरोधापेक्षा संवाद महत्त्वाचा असतो. जबरदस्तीने विवाह थांबवल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट त्यातून सामाजिक तेढ वाढते. सज्ञान तरुणीचा निर्णयाचा सन्मान करून सामोपचाराने मार्ग काढणे, हेच सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे.

संबंधित बातम्या

Back to top button