मनपा निवडणूकीला वेगळाच रंग खर्चावरून राडा… तलवारी उपसल्या

प्रभागातील विजयी उमेदवारांनी स्वपक्षीय पराभूत उमेदवाराला नुकसान भरपाई द्यायचे ठरवले होते

* बसपा नगरसेवक इस्माईल लालुवाले यांच्या भावाच्या दुकानावर सशस्त्र हल्ला

* पैशांच्या वादातून फ्रेजरपुर्‍यात प्रचंड तणाव
* प्रभाग निवडणुकीतील नवे अर्थकारण समोर आल्याने खळबळ
* 10 ते 15 जणांच्या टोळीचा धुमाकूळ; देशी कट्ट्याचा दाखवला धाक
* दोन संशयित ताब्यात शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
* सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अमरावती /23 मार्च : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता हिंसक वळण घेऊ लागले असून, सोमवारी रात्री फ्रेजरपुरा परिसरात बदल्याचे राजकारण पाहायला मिळाले. निवडणूक खर्चाच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून नवनिर्वाचित नगरसेवक इस्माईल लालुवाले यांच्या भावाच्या ’बब्बू किराणा’ दुकानावर 10 ते 15 जणांच्या सशस्त्र टोळीने भीषण हल्ला चढवला. धारदार शस्त्रे आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवत हल्लेखोरांनी दुकानातील सामानाची मोठी तोडफोड केली आणि गल्ल्यातील 40 हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 11 (फ्रेजरपुरा – रुक्मिणी नगर) मधून बहुजन समाज पक्षाच्या पॅनलमधील चारपैकी विद्या शिवदत्त माटे, इस्माईल कासम लालुवाले आणि सचिन किसनराव वैद्य हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत, तर शहिदाबानो अब्दुल हफीज यांना पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी पराभूत उमेदवाराला खर्चापोटी प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, निकाल लागून बराच काळ लोटल्यानंतरही ही रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने वादाची ठिणगी पडली. पराभूत उमेदवार शहिदाबानो यांचे पती अब्दुल नफीज अब्दुल हफीज हे गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक इस्माईल लालुवाले यांच्याकडे या पैशांचा तगादा लावत होते. हाच आर्थिक वाद सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास विकोपाला गेला. संतापलेल्या अब्दुल नफीज अब्दुल हफीज यांच्या मुलाने आपल्या 10 ते 15 साथीदारांसह इस्माईल लालुवाले यांच्या निवासस्थाना जवळ असलेल्या त्यांच्या भावाच्या दुकानावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हातात तलवारी आणि बंदुका घेऊन दुकानात शिरताच तोडफोड सुरू केली, ज्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, फ्रेजरपुरा ठाणेदार शिरसाट, शहर कोतवालीचे ठाणेदार कोटनाके, राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट हे शीघ्र कृती दलाच्या (टठढ) ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून पराभूत उमेदवार शहिदाबानो यांचा मुलगा आणि अन्य एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात घातक शस्त्रे आढळल्यास आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निवडणुकीची ‘ती’ बोली ठरली जीवघेणी!

पॅनलमधील उमेदवारांमध्ये झालेली अंतर्गत आर्थिक तडजोडच या हल्ल्याचे मुख्य कारण ठरली आहे. दिलेला शब्द पाळला न गेल्याने चक्क भरवस्तीत शस्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button