वरुड हादरले! बेभान बसने ऑटोला चिरडले; 5 ठार
13 वर्षीय माहीसह 4 जणांचा बळी, तर 2 गंभीर जखमी : राजुरा बाजार रस्त्यावरील घटना

वरुड/ 18 फेब्रुवारी – तालुक्यातील राजुरा बाजार जवळ आज सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. वरुड ते वर्धा मार्गावर धावणार्या ‘शिवाई’ बसने समोरून येणार्या प्रवासी रिक्षाला (ऑटो) जोरदार धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणार्या अपघातात 13 वर्षांच्या चिमुरडीसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत.
आज सकाळी 10.45 च्या सुमारास वाडेगाव येथील कैलास घनश्याम नागदेवे (42) हे एम एच 27 ए आर 1823 या क्रमांकाचा ऑटो घेऊन वरुडकडे येत होते. यावेळी ऑटोत शालेय विद्यार्थिनींसह 6 प्रवासी होते. राजुरा बाजार वरुन प्रवाशी घेऊन वरुडकडे जात असतांना वरुड वरुन वर्धा येथे जाणार्या वरुड-वर्धा एम एच 49 बी झेड 9436 क्रमांकाच्या भरधाव व अनियंत्रित असलेल्या शिवाई या इलेक्ट्रिक वर्धा आगाराच्या बसने वरुड राजुरा मार्गावरील चुडामन नदीवरील पुलानजीकच्या रस्त्यावर समोरुन येणार्या ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेतऑटोचा पुर्ण चेंदामेंदा झाला. या ऑटोत प्रवास करीत असलेले माही प्रविण मांगुळकर (13), चिंतामण सदाशिव नागदेवे (60), ऑटोचालक कैलाश घनश्याम नागदेवे (42) रा.सर्व वाडेगाव, ता.वरुड, हरिभाऊ दौलत शिंदे (83) वघाळ या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर राजकुमार प्रभुजी भलावी (30) गव्हाणकुंंड यांचा उपचारासाठी नेत असतांना कळमेश्वर जि.नागपुर नजीक मृत्यू झाला. या अपघातात ऑटोतील मोहिनी वनदेव भोरे (18) राजुरा बाजार, प्रतिभा प्रकाश लाड रा.वडाळा हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात होताच रस्त्याने ये जा करणार्यांनी अपघाताची बातमी पोलिसांना दिल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रुग्णसेवक अभिषेक जाधव, निलेश साबळे, राहुल सोनुले, धनंजय चरपे, निलेश गोमकाळे यांनी तातडीने सर्व जखमी व मृतकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर पडलेले मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नागपुर येथे पाठविण्यात आले. रस्त्यावर रक्ताचा पडलेला सडा अपघाताची भिषणता दर्शवित होता. रस्त्यावर अपघात झाल्याने ये-जा करणार्या वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी नागरिकांनी ग्रामीण रुग्णांलयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी सुरज उर्फ चक्रधर जनार्दन नागदिवे रा.वाडेगाव यांचे फिर्यादीवरुन वरुड पोलीसांनी 281, 125 (बी), 126, 106 (1) बी.एन.एस.अन्वये एस.टी.बस चालक निखिल रामभाऊ वरठी (26) रा.तळेगांव श्यामजीपंत ता.आष्टी, जि.वर्धा यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.
रक्ताने माखले रस्ते: अपघात एवढा भीषण होता की, ऑटोच्या पत्र्यात मृतदेह अडकले होते. निष्पाप प्रवाशांच्या रक्ताने राजुरा बाजारचा मार्ग लाल झाला होता.
‘शिवाई बस की ’काळ’? शिवाई बसच्या अतिवेगावर प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. आज याच वेगाने पाच कुटुंबांचे हसते-खेळते संसार उघड्यावर पाडले.
चिमुरडी माहीचा अंत: – अवघ्या 13 वर्षांच्या माहीचा या अपघातात बळी गेल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडलेल्या या जीवांचा काय दोष? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाचा वचक संपला का? वरुड-वर्धा मार्गावर खाजगी आणि निमशासकीय बसेसचे चालक नियमांची पायमल्ली करुन वाहने पळवतात. यावर परिवहन विभागाचे नियंत्रण का नाही? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
वाडेगाववर दुःखाचा डोंगर: मृतांमध्ये एकाच गावातील तिघांचा समावेश असल्याने वाडेगावमध्ये आज एकही चूल पेटली नाही संपूर्ण गाव सुतकात बुडाले आहे.
शाळेकरी मुलगी माहीच्या मृत्यूने लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा
या अपघातात मृत्यूमुखी माही प्रविण मांगुळकर ही वरुड शहरातील जे.जे.खेरडे प्राथमिक व उच्च प्राथमिक स्कूलची इयत्ता 8 वी विद्यार्थीनी होती. वाडेगाव येथुन बसेस नियमित नसल्यामुळे आणि गावावरुन वरुडला शिक्षणाकरीता दररोज ऑटोने येत होती, आज सकाळच्या सुमारास ती ऑटोमध्ये बसली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हा दुर्देवी अपघात झाला. आम्ही सर्व कुटूंबिय सालबर्डी यात्रेला जाणार होतो परंतु काही कारणास्तव आमचे सालबर्डी जाणे रदद झाले आणि हा अपघात घडला, कदाचित सालबर्डी गेलो असतो तर माझी मुलगी वाचली असती अशी प्रतिक्रिया मृत माहीचे वडिल प्रविण यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शिवाई आणि इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत देण्यात आल्या खर्या परंतु ग्रामीण भागामधुन या बसेस जात असतांना या बसेस वेग प्रचंड असल्याचे गावकर्यांचे म्हणणे असून जी बस वरुडहून वर्धा दररोज जात होती त्या बसेस वेग नेहमीच जास्त राहात होता, अपघाताच्या दिवशी सुध्दा ही बस वेगातच होती आणि त्यामुळे बसच्या धडकेत ऑटोसह ऑटोतील प्रवाशांच्या अक्षरश: चिंधळया उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, त्यामुळे ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसचा वेग नियंत्रित राहावा, याकरीता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने केली जात आहे.
वाडेगाव करीता आजचा बुधवार हा काळा दिवस ठरला. या अपघातामध्ये वाडेगाव येथील माही प्रविण मांगुळकर, कैलास घनश्याम नागदिवे, चिंतामन सदाशिव नागदिवे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. एकाच वेळी गावामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण गावामध्ये शोक व्यक्त केल्या जात होता. आज सायंकाळच्या सुमारास तिघांचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर कैलास आणि चिंतामन यांच्या पार्थीवावर एकाच वेळी तर माही हिच्या पार्थिवावर त्यापुर्वी वाडेगाव येथील हिंदु स्मशानभुमिमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे गोदावरी महादेव वाघ (81) यांचा सुध्दा वृध्दापकाळाने मृत्यू झाल्यामुळे वाडेगांवमध्ये एकाच वेळी 4 जणांनी या इहलोकाचा निरोप घेतल्याने गावात प्रचंड संवेदना व्यक्त केल्या जात होत्या.
दरम्यान अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मृतकांचे नातेवाईक आणि विशेषतः वाडेगाव ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातच ठिया देण्यास सुरुवात केली होती. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर अडून असल्यामुळे अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, वरुडचे आगार व्यवस्थापक आकाश तागडे, तहसीलदार रामदास शेळके, नायब तहसीलदार पंकज चव्हाण आणि ठाणेदार अर्जुन ठोसरे हे सुद्धा घटनास्थळावर दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कुटुंबियांच्या आर्त किंकाळ्या आणि संतप्त भावना
मृत माहीच्या वडिलांचे (प्रवीण मांगुळकर) काळीज पिळवटून टाकणारे शब्द:
‘माझ्या काळजाचा तुकडा शिकून मोठी होईल, असं स्वप्न पाहिलं होतं. सकाळी हसत-खेळत घराबाहेर पडली ती आता कधीच परत येणार नाही, हे कसं मान्य करू? त्या बस ड्रायव्हरच्या एका चुकीच्या वेगाने माझ्या चिमुरडीचा जीव घेतला. आता आमच्या जगण्याला काय अर्थ उरला?‘
ऑटो चालक कैलास नागदिवे यांच्या पत्नीचा टाहो -‘घरचा कर्ता पुरुष गेला, आता लेकराबाळांना कसं सांभाळू? कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन ते दररोज ऑटो घेऊन निघायचे. समोरून काळ बनून आलेल्या त्या बसने आमचा आधारच हिरावून नेला. आम्हाला न्याय हवा, त्या ड्रायव्हरला कडक शिक्षा व्हायलाच हवी!‘
चिंतामण नागदिवे यांच्या मुलाचे (फिर्यादी सुरज नागदिवे) गार्हाणे:-‘बाबांनी आयुष्यभर कष्ट केले. आज ते केवळ एका प्रवासासाठी घराबाहेर पडले होते. पण शिवाई बसच्या चालकाने ज्या बेदरकारपणे गाडी चालवली, त्याने आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ पाडला. रस्ता रक्ताने माखलेला पाहून आमचं काळीज फाटलं. हे नुकसान कधीच भरून येणार नाही.‘
हरिभाऊ शिंदे (83 वर्षे) यांच्या नातवाची व्यथा-‘आजोबांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली होती, ते आजही उत्साहाने वागायचे. पण या वयात त्यांना अशा भीषण मृत्यूला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं. रस्त्यावर चालणार्या माणसाची काहीच किंमत उरली नाही का? प्रशासनाने या बेफाम गाड्यांवर लगाम लावायला हवा.‘
गावकर्यांचा आणि प्रत्यक्षदर्शींचा संताप -‘हा अपघात नाही, तर हा सरळ सरळ खून आहे! शिवाई बसचे चालक या मार्गावर विमान उडवल्यासारख्या बस चालवतात. आज 5 निष्पाप जीवांचा बळी गेला, उद्या कोणाचा? जोपर्यंत या चालकांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.




