शहरात दोन खासदार, दोन आमदार तरीही पहिल्याच पावसात

अमरावती ‘ब्लॅक आऊट’

अमरावती / 8 जून- उन्हाळ्याच्या भयानक झळा सोसून हैराण झालेल्या अमरावतीकरांना पहिल्या पावसाने दिलासा दिला खरा, पण त्यासोबतच महावितरणचा ’भकास’ कारभार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची ’दुर्लक्षित’ व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सोमवारी रात्री पावसाची पहिली सर काय कोसळली, आणि संपूर्ण अमरावती शहर एका झटक्यात अंधारात बुडाले. तासनतास वीज गायब झाल्यामुळे जनता उकाड्याने आणि अंधाराने होरपळून निघाली. निवडणुकीत मते मागताना ’विकासाची’ गंगा वाहणार्‍या अमरावतीत दोन-दोन आमदार आणि दोन-दोन खासदार असतानाही, पहिल्याच पावसात शहराची ’पॉवर’ गुल कशी होते? असा संतप्त सवाल आता जनता थेट नेत्यांवर चिडून विचारत आहेत.
’मान्सूनपूर्व’ कामांचे कोट्यवधी रुपये गेले कुठे?-दरवर्षी उन्हाळ्यात ’मान्सूनपूर्व देखभाली’च्या नावाखाली महावितरण पाशवी पद्धतीने तासनतास वीज कापते. झाडांच्या फांद्या छाटणे, फिडर दुरुस्त करणे, तारांची जोडणी करणे या नावाखाली कोट्यवधी रुपयांची बिले काढली जातात. मग पहिल्याच पावसात झाडांच्या फांद्या तुटून पडतातच कशा? आणि यंत्रणा कोलमडतेच कशी? महावितरणचे हे कोट्यवधी रुपयांचे नियोजन नेमके कोणाच्या खिशात जिरले, याची चौकशी आता झालीच पाहिजे.
नेत्यांची फौज की ’शो-पीस’?-अमरावती शहराचे नेतृत्व सध्या कागदावर तरी अतिशय ’पॉवरफुल’ आहे. शहरात दोन कार्यसम्राट आमदार ठाण मांडून आहेत, तर जिल्ह्याला दोन-दोन खासदार लाभले आहेत. पण पहिल्याच पावसात जेव्हा संपूर्ण शहर अंधारात चाचपडत होते, तेव्हा हे चारही ’सूर्यमार्क’ लोकप्रतिनिधी कुठे होते? जनतेने तुम्हाला एसी गाड्यांमधून फिरण्यासाठी आणि केवळ श्रेयवादाच्या लढाईत मग्न राहण्यासाठी निवडून दिलेले नाही. जनतेला 24 तास वीज आणि पायाभूत सुविधा पुरवता येत नसतील, तर तुमच्या या ’तथाकथित’ विकासाच्या गप्पा म्हणजे शुद्ध ढोंग आहे, अशा शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.
वसुलीत वाघ, सुविधेत मात्र ठणठण गोपाळ!-सामान्य माणसाचे वीज बिल भरायला एक दिवस उशीर झाला, तर महावितरणचे वसुली अधिकारी वीज कनेक्शन कापायला वाघासारखे धावून येतात. पण वीज गुल झाल्यावर जेव्हा सामान्य नागरिक महावितरणच्या तक्रार केंद्रावर फोन लावतात, तेव्हा तिथले फोन चक्क बाजूला ठेवून दिले जातात किंवा ’नॉट रीचेबल’ करून ठेवले जातात. ग्राहकांकडून हजारो रुपयांची सुरक्षा ठेव आणि अव्वाच्या सव्वा बिल वसूल करणार्‍या महावितरणला पहिल्याच पावसात अमरावतीकरांना अंधारात डांबण्याचा काय अधिकार आहे?

अमरावतीकरांचा इशारा: ‘आता सहन करणार नाही!’

पहिल्याच पावसाने अमरावतीच्या विकासाचा बुरखा टराटरा फाडला आहे. रस्त्यावर झाडं पडली आहेत आणि वीज गायब आहे. जर पहिल्याच पावसात ही अवस्था असेल, तर संपूर्ण पावसाळ्यात अमरावतीकरांनी घरांमध्ये मेणबत्त्या लावून बसायचे का? राजकीय नेत्यांनी आता आपले फोटोबॅनर आणि एकमेकांवर चिखलफेक करणे थांबवावे आणि थेट महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरावे. अन्यथा, हाच अंधार आगामी काळात तुमच्या राजकीय भविष्यात डोकावल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा अमरावतीच्या सुजाण जनतेने दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button