लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी व्हावी

डॉ. हर्षवर्धन देशमुख यांचे प्रतिपादन

* विद्यापीठात संत गाडगेबाबांची दशसूत्रे व ग्रामविकासावर कार्यशाळेचे उद्घाटन

अमरावती/23 मार्च – देशाची लोकशाही खर्‍या अर्थाने बळकट करायची असेल तर ग्रामसभांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज असून, जोपर्यंत गावातील शेवटच्या घटकाला ग्रामसभेचे महत्त्व उमजत नाही, तोपर्यंत ग्रामीण विकासाचे ध्येय गाठता येणार नाही, असे परखड मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ’दशसूत्री आणि ग्रामविकास’ या विषयावरील सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी होते. याप्रसंगी डॉ. विद्या शर्मा, साहित्यिक डॉ. सतीश तराळ, सरपंच संघटनेचे संस्थापक गजानन बोंडे, अध्यक्ष राजेंद्र कराळे आणि डॉ. दिलीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, सरपंचांनी केवळ अधिकारांवर लक्ष न देता आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवावा. 73 व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था खर्‍या अर्थाने लागू झाली असली तरी, गाडगेबाबांच्या विचारांनुसार ग्रामविकास करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांनी गाडगेबाबांची दशसूत्री हा केवळ आध्यात्मिक उपदेश नसून तो विकासाचा कृती आराखडा असल्याचे सांगितले. केवळ परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वच्छता नव्हे, तर विचारांची शुद्धता राखणे हे विकासाचे पहिले पाऊल आहे. आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी सरपंचांना केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता श्रमदानातून गावे सुंदर करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत विदर्भातील सरपंचांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात सौ. लीनाताई तुरकर आणि प्रा. राजेंद्र कराळे यांनी प्रशासकीय जबाबदारी व शासकीय योजनांमधील अडचणींवर मार्गदर्शन केले. तसेच अरविंद दळवी, अ‍ॅड. देवा पाचभाई आणि अनिल पाटील यांनी उपस्थित सरपंचांच्या शंकांचे समाधान केले. डॉ. राजेश मिरगे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.

संबंधित बातम्या

Back to top button