तीन बड्या अर्थपुरवठादारांची कुंडली आता रडारवर

कोट्यावधींचे इंटरनॅशनल ड्रग्ज प्रकरण; चारही आरोपींची तुरुंगात रवानगी

* जिल्ह्याबाहेरील महसूल गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई

* अमली पदार्थांच्या तस्करीत चार आरोपी गजाआड

अमरावती /2 फेब्रुवारी : ऐतिहासिक अमरावती शहराला अमली पदार्थांच्या प्राणघातक विळख्यातून वाचवण्यासाठी नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रविवारी एका अत्यंत धाडसी आणि गोपनीय मोहिमेचा यशस्वी थरार घडवून आणला. या धडक कारवाईत सुमारे 10 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य असलेले 4 किलो 902 ग्रॅम ’मेफेड्रॉन’ (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शहरातील आणि जिल्ह्यातील चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली आहे. या कारवाईमुळे केवळ अमरावतीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईतून होणारा 100 कोटींचा व्यवहार उधळून लावण्यात पथकाला यश आले आहे.
या मोहिमेची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आणि सुनियोजित होती. नागपूर डीआरआयचे तीन चमू अधिकारी गौरव मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, 31 जानेवारी रोजीच शहरात दाखल झाले होते. मुंबईवरून अमली पदार्थांची एक मोठी खेप अमरावतीत येणार असल्याची पक्की माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. रविवारी दुपारी पथकाने नवसारी परिसरातील एका उपाहारागृहावर आणि काही संशयास्पद सदनिकांवर एकाच वेळी छापे टाकले. या धाडसत्रात फैजल खान अन्सार खान (वय 22, रा. गुलिस्ता नगर), मुस्तकीम खान अब्दुल ताहेर खान (वय 29, रा. कसाबपुरा, चांदूर बाजार), अवेज अहमद आरिफ अहमद (वय 25, रा. कसाबपुरा, चांदूर बाजार) आणि शेख परवेज शेख नदिर (वय 32, रा. चांदणी चौक) या चौघांना अमली पदार्थांच्या साठ्यासह रंगेहात पकडण्यात आले.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले फैजल खान आणि अवेज अहमद हे यापूर्वीही डिसेंबर 2025 मध्ये 70 ग्रॅम अमली पदार्थ प्रकरणात सहभागी होते. मात्र, त्यावेळी त्यांनी कायदेशीर पळवाट शोधत अटकपूर्व जामीन मिळवला होता. पण यावेळी डीआरआयने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, या कारवाईचे धागेदोरे काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे झालेल्या धाडीशी जुळलेले आहेत. या काळ्या धंद्याला रसद पुरवणारे आणि पडद्यामागून सूत्रे हलवणारे शहरातील तीन बडे सावकार आता तपास यंत्रणेच्या निशाण्यावर आहेत. हे अर्थपुरवठादार नेमके कोण आहेत आणि त्यांचे राजकीय किंवा सामाजिक वजन काय आहे, याची सखोल चौकशी सुरू असून कोणत्याही क्षणी त्यांना बेड्या ठोकल्या जाऊ शकतात. सोमवारी या चारही आरोपींना स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. डीआरआयच्या वतीने नागपूरचे प्रख्यात वकील नालमवार यांनी बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने वकील मुर्तझा आझाद यांनी युक्तीवाद केला. सुरुवातीला पथकाने आरोपींची 16 फेब्रुवारीपर्यंत कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने वस्तुस्थिती पाहता चौघांनाही 4 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक पोलिसांची गुप्तचर यंत्रणा शहरात अमली पदार्थांचा इतका मोठा साठा येत असताना सुस्त का होती, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

अमली पदार्थ मिळणे शहरासाठी धोक्याची घंटा!

अमरावतीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले जाणे ही शहरासाठी धोक्याची घंटा असून, आपल्या मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. अमली पदार्थांच्या या काळ्या धंद्यात सामील असलेल्या गुन्हेगारांची आता खैर नाही; संशयास्पद जागा आणि बंद कारखान्यांवर पोलिसांची करडी नजर असेल. जे कोणी तरुणाईला नशेच्या खाईत लोटण्याचे पाप करतील, त्यांच्यावर थेट तडीपारीचा बडगा उगारला जाईल. शाळा आणि वसतिगृहात जनजागृतीचा धडाका लावून आपण हे व्यसनाचे जाळे मुळासकट उपटून टाकू. ’नशामुक्त भारत’ करण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने या लढाईत सहभागी व्हावे, असे माझे आवाहन आहे. अमरावतीला अमली पदार्थमुक्त करणे हाच आमचा आता मुख्य संकल्प आहे.
– आशिष येरेकर, जिल्हाधिकारी, अमरावती

 

केवळ मोघम आरोप नकोत, ठोस पुरावे द्या; तात्काळ कारवाई करू!

शिंदे शिवसेनेने केलेल्या आरोपांना उत्तर देताना पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आयुक्त म्हणाले की, पोलीस दल अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवत आहे. केवळ राजकीय हेतूने किंवा मोघम स्वरूपाचे आरोप करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करू नये. जर शहरात कुठेही मटका, गुटखा किंवा अवैध दारू विक्री सुरू असेल, तर नागरिकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी त्याबद्दलचे ठोस पुरावे आणि नेमकी माहिती आम्हाला द्यावी. अशा माहितीची खातरजमा करून संबंधित गुन्हेगारांवर आम्ही तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करू. – राकेश ओला (पोलीस आयुक्त)

पोलीस की गुन्हेगारांचे पाठीराखे?

अमरावतीत स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली 10 कोटींचे अमली पदार्थ सापडणे, ही प्रशासकीय यंत्रणेसाठी लाजिरवाणी बाब आहे. शहरात मटका, गुटखा आणि अवैध दारूचा सुळसुळाट झाला असताना प्रशासन केवळ पुराव्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. बाहेरच्या पथकाने कारवाई करेपर्यंत स्थानिक पोलीस झोपले होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्यात आपले सरकार असूनही जर सामान्यांना न्याय मिळत नसेल आणि प्रशासन दाद देत नसेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल. गुन्हेगारांना पाठिशी घालणार्‍यांची गय केली जाणार नाही; हा आमचा इशारा आहे. – श्याम देशमुख, शिवसेना नेते

संबंधित बातम्या

Back to top button