महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना सामाजिक न्यायाचा पाया

डॉ. ओमराज गजभिये यांचे प्रतिपादन

* विद्यापीठात सामाजिक सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न

अमरावती/12एप्रिल– तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना केवळ राजकीय हक्कांपुरती मर्यादित नाही, तर ती मानवी मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा खरा पाया आहे, असे परखड मत डॉ. ओमराज गजभिये यांनी मांडले. लोणार येथील कमलाताई बनमेरू महिला महाविद्यालयाचे डॉ. गजभिये, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे आयोजित ‘समता सप्ताह-2026’ च्या निमित्ताने बोलत होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘महात्मा फुले यांचा समतावादी दृष्टिकोन’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी समाजातील सद्यस्थितीवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण होते, तर व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. मनीषा कोडापे आणि डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. डॉ. गजभिये यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले की, आजच्या काळात मानवी मूल्यांना तडा देण्याचे प्रयत्न होत असताना समाजाने जागृत राहणे गरजेचे आहे. पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू झालेली पहिली शाळा ही केवळ अक्षरांची ओळख नव्हती, तर हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून स्त्रियांना मुक्त करणारी एक मोठी क्रांती होती. फुलेंनी केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरच लक्ष दिले नाही, तर कामगारांच्या हक्कासाठीही लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून याच समतेच्या विचाराला कायद्याचे बळ मिळवून दिले. आपल्या हक्क आणि कर्तव्याबाबत आज आपण सावध झालो नाही, तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य अंधकारमय होईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रमुख पाहुण्या डॉ. मनीषा कोडापे यांनी सांगितले की, फुले दांपत्याने समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे असल्या तरी व्यापक मानसिक परिवर्तनाची मोठी गरज आहे. केवळ घोषणा न देता प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलणे हेच या व्याख्यानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. दादाराव चव्हाण यांनी स्पष्ट केले की, फुले दांपत्याच्या त्यागामुळेच आज आपण ताठ मानेने उभे आहोत. विद्येचे महत्त्व सांगताना त्यांनी फुलेंच्या ‘विद्येविना मती गेली’ या प्रसिद्ध ओळींचा दाखला दिला. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. पंडित भोयर यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. डॉ. संतोष बनसोड यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन वर्षा लोणारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कल्पना पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. प्रेमानंद तिडके, उपकुलसचिव राहुल नरवाडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, ड. अरुण रौराळे यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button