कोळसा झालेले प्रेत आर्वीच्या युवकाचे…
सहा आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी लावला छडा

* पथ्रोट कालव्यातील गुन्ह्याला कलाटणी
* पुरावा नष्ट करण्यासाठी अचलपुरात जाळून हत्या
* पैशांच्या वादातून रचला मृत्यूचा थरार
पथ्रोट/ 12 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका तरुणाची आर्थिक व्यवहाराच्या वादातून अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याचा मृतदेह अचलपूर तालुक्यातील पथ्रोट जवळील वागडोह शिवारात जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास चक्रे फिरवत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मृत तरुणाचे नाव शेख शाहरुख शेख रऊफ असून, आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अचलपुरात आणून जाळला होता. मात्र, वागडोह-खोडगाव मार्गावरील एका शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा छडा लावला.
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील वागडोह ते खोडगाव मार्गावरील मारुती जहागीरपुर शेत शिवारात बुधवारी रात्री एका अनोळखी तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. वागडोहचे पोलीस पाटील सुभाष काकडे यांनी पथ्रोट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रभारी अधिकारी अभय चौथणकर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. धरणाच्या कालव्याजवळ हा मृतदेह पडला होता आणि तिथेच कच्च्या रस्त्यावर एका चारचाकी गाडीच्या टायरचे निशाण पोलिसांना दिसून आले. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पथ्रोट पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील ’पद्मश्री’ हॉटेलचा मालक शुभम रॉय हा त्याच्या पांढर्या रंगाच्या गाडीने हॉटेलवरील कामगारांसह संशयास्पदरीत्या त्या भागात फिरताना दिसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मृताचे आरोपी प्रशांत महाजन यांच्याशी पैशांवरून भांडण झाले होते. या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हत्येचा कट रचला. अली अजगर सद्दाम हुसेन याने शाहरुखला पैशांचे आमिष दाखवून गावाबाहेर बोलावले. तिथे टिकेश महाजन आणि अली अजगर यांनी त्याला बेदम मारहाण करून ठार केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शुभम रॉय याच्याकडे मृतदेह सोपवण्यात आला. शुभमने त्याच्या हॉटेलवरील तीन कामगारांच्या मदतीने शाहरुखचा मृतदेह धरणाच्या कालव्यात नेऊन जाळला. या प्रकरणी पोलिसांनी टिकेश प्रशांत महाजन (28, रा. गणपती वॉर्ड, आर्वी), प्रशांत हरिश्चंद्र महाजन (59, रा. आर्वी), शुभम मोहनलाल रॉय (28, रा. अंजनगाव सुर्जी), अली अजगर सद्दाम हुसेन (28, रा. जाजूवाडी, आर्वी), हर्षित प्रकाश गौर (19, रा. अंजनगाव सुर्जी) आणि निखिल दीपचंद गौर (32, रा. अंजनगाव सुर्जी) या सहा जणांना अटक केली आहे. तसेच एक विधीसंघर्षित बालकही यात सामील आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पांढरी कार आणि 7 मोबाईल जप्त केले आहेत. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे, अंजनगावचे ठाणेदार सूरज बोंडे, अनंत वडतकर, सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले आणि सायबर सेलच्या चमूने पार पाडली.
रस्त्यावरील टायरच्या खुणांनी उघडले हत्येचे गुपित -हत्येनंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या टायरच्या खुणा आणि संशयास्पद पांढर्या गाडीच्या हालचालींमुळे पोलिसांना मुख्य धागा मिळाला. अंजनगावच्या हॉटेल मालकाच्या कबुलीने आर्वीपासून अचलपूरपर्यंत पसरलेले हत्येचे हे भयानक जाळे अखेर विणले गेले आणि आरोपी गजाआड झाले.




