रोहणखेडा येथे कृषीदूतांकडून मृदा नमुना चाचणीचे प्रात्यक्षिक

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी उपक्रमांना प्रारंभ

नांदगाव पेठी/8 जून : पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2026-27 अंतर्गत रोहणखेडा येथे कृषीदूतांकडून विविध कृषी व कृषिसंलग्न उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबरच शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यात येणार आहे.
उपक्रमाच्या प्रारंभी कृषीदूतांनी शेतातील मातीचा नमुना शास्त्रोक्त पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. तसेच मृदा परीक्षणाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि जमिनीच्या आरोग्याचे संवर्धन याबाबत शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.मृदा परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तसेच इतर आवश्यक घटकांची अचूक माहिती मिळते. त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन करणे शक्य होत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते आणि पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते, अशी माहिती कृषीदूतांनी यावेळी दिली. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे, उपप्राचार्य नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक तसेच मृदा विज्ञान विभागाच्या तज्ज्ञ प्रा. श्वेता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.खरीप हंगामात कृषीदूत म्हणून कार्यरत असलेले ओम सरोदे, रविराज गोटे, सिद्धेश भोयर, अथर्व रसे आणि आयुष तिखे हे गावात विविध कृषीविषयक जनजागृती कार्यक्रम, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे व कृषिसंलग्न उपक्रम राबविणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button