एनडीएचे सरकार आल्याने मागील 12 वर्षांत देशाचं भाग्य बदललं-मोदी

पीएम नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

नवी दिल्ली/10 जून  – 2014 पूर्वी देशाने दीर्घकाळ राजकीय अस्थिरता आणि गोंधळाचा काळ अनुभवला. त्याचं नुकसान देशाला भोगावे लागले. परंतु आता जनता एका स्थिर आणि निर्णायक सरकारचे काम पाहत आहे. जनतेच्या विश्वासानेच एनडीएला आपली प्रगती सुरू ठेवण्याचे बळ दिले आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार व्यक्त केले. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मधील एनडीएचा विजय हा केवळ एक निवडणुकीतील विजय नव्हता तर तो सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्या आशा आणि आकांक्षांचा उदय होता. काँग्रेस पक्षाबद्दल भ्रमनिरास झालेल्या जनतेने एनडीएवर विश्वास ठेवला आणि गेल्या 12 वर्षांनी तो विश्वास आणखी दृढ केला आहे. भारताचा विकास दर संथगतीने राहील असं वर्षानुवर्षे देशाला सांगण्यात आले. त्या काळाला ’हिंदू ग्रोथ रेट’ म्हणणे चुकीचे होते, कारण ते अपयश सरकारांचे होते, जनतेचे नाही. त्याला ’काँग्रेस ग्रोथ रेट’ म्हटलं पाहिजे होते असा टोला त्यांनी लगावला. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने पहिल्यांदाच देशाला जलद विकासाची झलक दाखवली. मात्र 2004 नंतर देश पुन्हा काँग्रेसच्या राजवटीखाली आला, जिथे विकासाचा वेग मंदावला आणि घोटाळ्यांचा काळ सुरू झाला. 2014 मध्ये एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर जेव्हा हेतू, धोरणे आणि निर्णय एकत्रितपणे काम करतात, तेव्हा विकासाला कसा वेग येतो हे देशाने अनुभवले. गेल्या 12 वर्षांची कहाणी ही केवळ आकडेवारीबद्दल नाही तर नव्या भारताच्या आत्मविश्वासाबद्दल आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.दरम्यान, जर 12 वर्षांत इतके काही घडू शकते, ते अनेक दशके का घडले नाही?. हाच ’काँग्रेसच्या ग्रोथ रेट’ आणि ’एनडीएच्या ग्रोथ रेट’मध्ये असलेला फरक आहे. पूर्वीची व्यवस्था लोकांना वाट पाहायला लावत होती, तर आजची व्यवस्था वेळेवर परिणाम देते. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करत असताना भारताने 2025-26 मध्ये 7.7 टक्के विकास दर गाठला आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीतही भारताचा विकास दर 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला.
मध्यमवर्गाला कर सवलत-2014 पूर्वी मध्यमवर्गावर गुंतागुंतीच्या करप्रणाली आणि नियमांचे ओझे होते. आज 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. फेसलेस टॅक्स सिस्टम आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ झाले आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विकसित भारताची हमी आजचा आकांक्षी भारत आहे. देशाच्या वाढत्या आकांक्षांचा सर्वात मोठा वाहक हा मध्यमवर्ग आहे आणि सरकार त्यांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितले.लोक सहभागावर भर – गेल्या 12 वर्षांत सरकार आणि समाज यांच्यातील भागीदारीमुळे अनेक मोठे बदल शक्य झाले आहेत. स्वच्छ भारत अभियान, डिजिटल पेमेंट आणि कोविड-19 महामारीच्या काळात देशवासियांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक राज्य विकासाच्या शर्यतीत आघाडी घेईल आणि पुढील दशक कर्तृत्वाने उत्कृष्टतेचे दशक बनेल असं आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button