25 विरोधी पक्ष आले एकत्र
भाजपविरोधात 5 मुद्यांवर मोठा निर्णय

मुंबई/8 जून-आगामी संसदीय अधिवेशन आणि देशातील विविध राजकीय व आर्थिक घडामोडींवर संयुक्त भूमिका निश्चित करण्यासाठी सोमवारी राजधानी दिल्ली येथे झालेल्या विरोधी इंडिया आघाडीच्या बैठकीत 25 पक्षांनी सहभाग घेतला होता. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याबाबत बैठकीत एकमत झाले. आघाडीची पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, विशेष मतदार यादी पुनरावलोकन, मतदान प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि निवडणुकीतील पारदर्शकतेच्या प्रश्नांबाबत लवकरच भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.तसेच लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करण्यावरही सर्व घटक पक्षांची सहमती झाली आहे.देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही इंडिया आघाडीने केली आहे.याशिवाय आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय झाला असून संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात नियमित समन्वय बैठका घेण्यात येणार आहेत.




