महसूलमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही

मनोज जरांगे यांच्यावर आ. प्रवीण पोटे यांचा हल्लाबोल

12 कोटी जनतेचा अपमान केल्याचा आरोप

अमरावती /9 ऑगस्ट – भाजपचे ज्येष्ठ नेते आ. प्रवीण पोटे पाटील यांनी महायुती सरकारचे महसुलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याबद्दल अपशब्द बोलणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. जरांगे यांच्याकडून मंत्र्यांना अर्वाच्छ भाषा वापरली जाणे म्हणजे थेट महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. अमरावती विभागात या विधानामुळे संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर देखील याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मराठा समाजाच्या हितासाठी मोठी पावले उचलली असून त्यांच्याच मंत्रिमंडळात राजस्व मंत्री म्हणून बावनकुळे उत्तम काम करत आहेत. असे असताना त्यांच्याविषयी काढलेले अपशब्द अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका आ. पोटे यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळताना सरकारकडून कोणतीही अडचण निर्माण केली जात नाही आणि शासनाकडून त्यांना योग्य न्याय मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांनी समाजासाठी केलेले प्रयत्न अत्यंत मोठे असल्याचे सांगत पोटेंनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमरावतीविभागात या संपूर्ण वादाचे तीव्र पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेत्यांपासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वजण या अपमानास्पद वक्तवण्याचा जाहीर निषेध करत आहेत. सोशल मीडियावर देखील या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चा झडत असून जनमानसात असंतोष पाहायला मिळत आहे. शासनाच्या चांगल्या कामांवर अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही, असे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button