पोलिस आयुक्तांचा ठाणेदारांना धक्का
गाडगेनगर, नांदगाव पेठचे पोलिस निरिक्षक हटविले

* पाच बड्या अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या
अमरावती / 17 फेब्रुवारी : शहर पोलीस दलातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त अधिक कडक करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील पाच महत्त्वाच्या पोलीस अधिकार्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तातडीने बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गाडगेनगर आणि नांदगाव पेठ यांसारख्या महत्त्वाच्या ठाण्यांना नवे कारभारी मिळाले असून, हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची बैठक 17 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 न च्या पोट कलम (1) (क) मधील तरतुदींचा वापर करून हे फेरबदल करण्यात आले आहेत. या बदली सत्रामुळे पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, कामात गती आणण्यासाठी आयुक्तांनी ही पावले उचलल्याचे बोलले जात आहे. बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये पोलीस निरीक्षक श्री. गोरखनाथ जाधव यांची कल्याण शाखेतून गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गाडगेनगरचे तत्कालीन निरीक्षक श्री. अतुल वर यांची आता विशेष शाखेत बदली झाली आहे. तसेच विशेष शाखेतील निरीक्षक श्री. निलेश करे यांची रवानगी कल्याण शाखेत करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्तरावरही मोठे बदल झाले असून, नियंत्रण कक्षातील श्री. सागर ठाकरे यांची गाडगेनगर पोलीस ठाण्यात, तर श्री. गणेश राऊत यांची नियंत्रण कक्षातून थेट नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. हे सर्व बदल तात्पुरत्या स्वरूपात असून पुढील आदेशापर्यंत संबंधित अधिकार्यांनी नवीन ठिकाणी त्वरित रुजू व्हायचे आहे.
प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट-पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहर पोलीस दलातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे विशेष आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षकांसह एकूण पाच जणांच्या बदल्यांचा समावेश असून, त्यांना तातडीने नवीन पदभारावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.




