नीट पेपर फुटीचे रॅकेट अमरावतीत सक्रीय?
शहरातील खासगी क्लासेस सीबीआयच्या रडारवर

अमरावती/18 मे– देशातील सर्वोच्च वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटीचा घोटाळा आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला असून याची झळ अमरावती जिल्ह्याला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक, पुणे आणि लातूर येथील अटकेच्या सत्रानंतर आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची (सीबीआय) नजर अमरावतीमधील नामांकित प्रशिक्षण संस्थांवर खिळली आहे. लातूर येथून या घोटाळ्यातील एका मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतल्याने, या संपूर्ण गैरव्यवहाराचे धागेदोरे अमरावतीच्या वर्तुळाशी थेट जोडले गेल्याची खळबळजनक चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. येथील स्थानिक प्रशिक्षण संस्थांचा लातूर आणि इतर मोठ्या शहरांमधील चालकांशी थेट संशयास्पद संपर्क असल्याचे समोर येत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्या या व्यावसायिक संस्थांमध्ये संभाव्य प्रश्नपत्रिका देण्याच्या नावाखाली थेट मूळ प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नच पुरवले जात असल्याचा गंभीर संशय आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याच्या भीतीने विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहेत. काही लोकांच्या पैशांच्या हव्यासापायी गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.या संपूर्ण काळ्या बाजाराची रचना अत्यंत नियोजित पद्धतीने केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात नशीब आजमवू पाहणार्या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच जाळ्यात ओढण्यासाठी अमरावती आणि अकोला परिसरातील संस्था मोठ्या शहरांच्या तोडीस तोड प्रचार करतात. विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ’संभाव्य प्रश्नपत्रिका’ (गेस पेपर) नावाचे एक मोठे हत्यार वापरले जाते. आमची प्रश्नपत्रिका परीक्षेसाठी कशी तंतोतंत खरी ठरेल, असा छातीठोक दावा करून पालकांकडून दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत अवाढव्य शुल्क वसूल केले जाते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका फुटीची खरी मेख याच संभाव्य प्रश्नपत्रिकेत दडलेली असते. मुख्य परीक्षेचा मूळ पेपर आधी दहा लाखांना खरेदी केला जातो, त्यानंतर तो पुढे पंधरा ते पंचवीस लाख रुपयांना विकला जातो. या मूळ पेपरमधील काही महत्त्वाचे प्रश्न हुबेहूब उचलून हे चालक स्वतःच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करतात. जेव्हा हेच प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे येतात, तेव्हा या संस्थांचे नाव मोठे होते आणि पुढील वर्षासाठी लाखो रुपयांची नवी कमाई निश्चित होते. या गळेकापू स्पर्धेत टिकण्यासाठी येथील बहुतांश नामवंत प्रशिक्षण संस्थांनी महाविद्यालयांशी छुपी युती केली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला न जाताही त्यांची उपस्थिती कागदोपत्री पूर्ण दाखवली जाते आणि दुसरीकडे अहोरात्र फक्त या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. अमरावती शहरात सध्या अशा बाराहून अधिक बड्या संस्था कार्यरत असून चार हजार विद्यार्थ्यांच्या हिशोबाने हा व्यवसाय आता अब्जावधींच्या घरात पोहोचला आहे. लातूरची चौकशी जशी पुढे सरकेल, तशी अमरावतीमधील अनेक बड्या धेंडांची नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पैशांचा हव्यास अन् भवितव्य उद्ध्वस्त-काही लोकांच्या पैशांच्या अतिथी हव्यासापायी आज अमरावतीमधील हजारो निष्पाप विद्यार्थ्यांचे भवितव्य पूर्णपणे अंधारात सापडले आहे. दिवसरात्र एक करून अभ्यास करणार्या प्रामाणिक मुलांवर केवळ या शिक्षणसम्राटांच्या काळ्या कृत्यांमुळे पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जाण्याची भयंकर वेळ ओढवली आहे.




