अमरावतीत पैशांच्या वादातून मित्राची हत्या

चपरासीपुर्‍यात मध्यरात्री चाकूने सपासप वार, दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

अमरावती/11 मे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जुन्या पैशांच्या वादातून एका 38 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. सय्यद नाझीम सय्यद साल्लर असे मृताचे नाव असून या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सय्यद नाझीम हा रविवारी रात्री आपल्या चुलत भावासह आणि मित्रांसोबत परिसरात फिरत होता. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाझीमचा आरोपी निशांत भाोडवे याच्याशी भ्रमणध्वनीवर पैशांच्या देवाणघेवाणीवरून मोठा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने नाझीम त्याला भेटण्यासाठी मदिना मांधा केंद्राच्या बाजूला असलेल्या गल्लीत गेला. तिथे आधीच दबा धरून बसलेला निशांत आणि त्याचा मित्र यश कोरी या दोघांनी नाझीमवर चाकूने हल्ला चढवला. आरोपींनी नाझीमच्या गळ्यावर, डोक्यावर आणि ओठावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. नाझीमने आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जागे झाले, हे पाहून दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नाझीमला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या थरारक घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच निशांत रवींद्र भाोडवे (वय 27, रा. चपराशीपुरा) आणि यशराज रवींद्र कोरी (वय 26, रा. देवदत्त नगर) या दोघांना अटक केली आहे. शेख तौसिफ याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

रागाच्या भरात घेतला मित्राचा जीव

पैशांच्या किरकोळ वादाने काही क्षणांत हिंसक रूप घेतले. मित्रांनीच चाकूने वार करून मित्राचा जीव घेतल्याने चपरासीपुरा परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button