महावितरणच्या विविध सेवांचा 2,300 ग्राहकांना लाभ
483 नवीन वीज जोडण्यासह 772 तक्रारींचे जागेवरच निवारण

अमरावती /11ऑक्टोबर : महावितरणच्या अमरावती परिमंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा थेट लाभ परिमंडळातील तब्बल 2 हजार 295 ग्राहकांना मिळाला असून, आणखी 647 कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये अमरावती जिल्ह्यातील 895, तर यवतमाळ जिल्ह्यातील 2 हजार कामांचा समावेश आहे.
मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणतर्फे अमरावती परिमंडळात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान हे विशेष अभियान राबवले जात असून या अभियानाअंतर्गत तालुकानिहाय ‘सेवा सेतू कॅम्प’ उभारण्यात आले आहे. एकाच छताखाली नवीन वीज जोडणी, प्रलंबित वीज जोडण्या तत्काळ देणे, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, नाव व पत्त्यात बदल करणे, वीज भारात सुधारणा करणे, तसेच ’महाराष्ट्र रूफ टॉप सोलर आवासीय (स्मार्ट) योजना’ आणि ’पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ची जनजागृती करून ग्राहकांना थेट लाभ मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या अभियानादरम्यान मागील 24 दिवसांत 483 ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून 221 जोडण्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच 140 ग्राहकांचा वीज भार बदलणे, 412 ग्राहकांच्या नावात सुधारणा आणि 82 ग्राहकांचा पत्ता बदलण्यात आला आहे. तसेच 565 बिलिंगविषयक, 108 रूफटॉप सोलर, 31 सौर कृषी पंप आणि 68 इतर अशा एकूण 772 तक्रारींचे घटनास्थळीच निवारण करण्यात आले आहे. अभियानात सौर ऊर्जा योजनांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दारिद्र्यरेषेखालील किंवा 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणार्या ग्राहकांसाठी लागू असलेल्या ‘महाराष्ट्र रूफ टॉप आवासीय (स्मार्ट) योजने’बाबत 70 ग्राहकांनी विचारणा केली असून 49 ग्राहकांनी यात सहभाग नोंदवला आहे. या योजनेत 1 किलोवॅटची सौर यंत्रणा छतावर बसवली जाते, ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना 2500 रुपये, अनुसूचित जाती/जमाती वर्गातील ग्राहकांना 5000 रुपये आणि इतर ग्राहकांना 10 हजार रुपये भरावे लागतात, तर उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते. तसेच ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत 287 ग्राहकांनी माहिती घेतली असून 250 ग्राहक सहभागी झाले आहेत. या योजनेत छतावर सौर यंत्रणा बसवणार्या ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.





