महावितरणचा वीजबिलासाठी शेतकर्यांकडे मोर्चा
6 हजार 76 कृषीपंपधारक शेतकर्यांकडे 201 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी

अमरावती /20 मार्च : अमरावती परिमंडळाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 7.5 एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक शेतकर्यांकडे तब्बल 201 कोटी 64 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात येत असून कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल वसुली करत आहेत. त्यामुळे संबंधित थकबाकीदार शेतकर्यांनी थकीत वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, ‘बळीराजा मोफत वीज योजना’ ही सर्व कृषीपंपधारकांसाठी लागू नसून केवळ 7.5 एचपीपेक्षा कमी क्षमतेच्या कृषीपंपांसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत शासनाने 2025 ते 2030 या कालावधीत अशा पंपांचे चालू वीजबिल शून्य केले आहे. मात्र 7.5 एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारकांना वीजबिल भरणे बंधनकारक असल्याचे महावितरणने पुन्हा अधोरेखित केले आहे. शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत विकेंद्रीत स्वरूपातील सौर प्रकल्प उभारणी, फिडर विलगीकरण, नवीन वीजवाहिन्या, रोहित्रे आणि उपकेंद्र उभारणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परिमंडळातील सुमारे 2 लाख 80 हजार शेतकर्यांपैकी जवळपास 70 टक्के शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली. परिमंडळातील 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या एकूण 6 हजार 76 कृषीपंपधारक शेतकर्यांकडे 201 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यातील 4 हजार 98 शेतकर्यांकडे 106 कोटी 2 लाख रुपयांची थकबाकी असून, यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 978 शेतकर्यांकडे 95 कोटी 62 लाख रुपयांची वीजबिल थकीत आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदार शेतकर्यांना वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




