डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान
विनायक विद्यामंदिर येथे आयोजन

अमरावती/15 एप्रिल: भारताच्या मातीतील प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क मिळवून देणारे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा सोहळा छत्री तलाव परिसरातील विनायक विद्यामंदिर महाविद्यालयात मोठ्या थाटात साजरा झाला. इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालयाच्या डॉ. तुलिका खडसे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. शीतल काळे होते, तर व्यासपीठावर कला शाखा प्रमुख डॉ. सागर पडोळे आणि इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र वानखडे यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव श्री. यश खोडके यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून बाबासाहेबांच्या विचारांची कास धरण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. नरेंद्र वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राचे महत्त्व सांगत बाबासाहेबांचे साहित्य वाचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख वक्त्या डॉ. खडसे यांनी बाबासाहेबांच्या समतावादी विचारांवर प्रकाश टाकला. हिंदू कोड बिलाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, स्त्रियांना पित्याच्या संपत्तीत वाटा, प्रसूती रजा आणि मतदानाचा अधिकार मिळवून देणारे बाबासाहेब हे खर्या अर्थाने स्त्रियांचे उद्धारकर्ते आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ उत्सव न साजरा करता बाबासाहेबांसारखा व्यासंग जोपासावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. काळे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हितेश भागवत यांनी केले, तर आभार सिमरेला देशमुख यांनी मानले. याप्रसंगी डॉ. राजेश बजाज, प्रा. विशाल वरघट, प्रा. प्रमोद ढोले, प्रा. संगीता बंड, प्रा. विधिनी शेंडे, प्रा. सुप्रिया भातकुले, प्रा. वैष्णवी बोबडे, प्रा. केतकी खेडकर, सागर देशमुख, रोशन माहुरे, श्री. रवींद्र खडसे, वैभव बंडाबुचे, वैशाली नागे, वैशाली कराळे, पूजा लाडोळे, भाग्यश्री देशमुख आणि खुशबू अल्सेट यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम रुमणे, सम्यक तागडे व जानव्ही सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.




